
Eknath Shinde: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणानंतर माध्यमांमध्ये बोलणं कमी आणि काम जास्त करण्याचा सल्ला एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना दिला आहे.
माध्यम किंवा जनसामान्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे स्वत: मंत्र्याचं आणि पक्षाचं नाव खराब होतं. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलचं पहिजे असं नाही, त्यांना कामातून उत्तर द्या, अशी तंबीचं वाचाळवीर मंत्र्यांना एकनाथ शिंदेंनी दिली आहे. तसेच मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यातून निवडणुकांमध्ये अपेक्षित निकाल दिसला पाहिजे, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. त्यामुळे अप्रत्यक्ष शिंदेंनी मंत्र्यांना अडीच वर्षाच्या कालावधीची आठवण करून देत मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली होती नाराजी-
राज्यातील मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मागील काही दिवसांमध्ये मंत्र्यांसंदर्भात आलेल्या तक्रारींवर देवेंद्र फडणवीस यांन नाराजी दर्शवली होती. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्री संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत राहिले. विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आला.
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा चर्चेत-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या दौऱ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 25 मिनिटं एकांतात चर्चा झाली. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनासोबत घेऊनही एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंसह त्यांच्या पत्नी, मुलगा श्रीकांत शिंदे आणि सुनबाई हजर होत्या. एकनाथ शिंदेंनी मोदींना शंकराची प्रतिमा भेट दिली. ऑपरेशन महादेवच्या यशामुळे शंकराची प्रतिमा नरेंद्र मोदींना भेट दिल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
संबंधित बातमी:
आणखी वाचा