
मुंबई : बेस्टच्या महाव्यवस्थापक पदासाठी नगरविकास खाते आणि सामान्य प्रशासन खात्याने एकाचवेळी दोन नियुक्त्यांचे आदेश काढल्यानंतर राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता नगरविकास खात्याने यू टर्न घेत स्पष्टीकरण दिलं आहे. अश्विनी जोशी यांच्याकडे पदभार सोपवण्याचा आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू होती, पण तो आदेश काढण्यात आला नसल्याचं नगरविकास खात्याने म्हटलं आहे.
महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार हा अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवला असल्याचं बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने बुधवारी सकाळी सांगितलं होतं. पण सामान्य प्रशासन विभागाने दुसरे पत्र जारी करत आशिष शर्मा यांच्याकडे हा पदभार दिल्याचं पत्र जारी केलं.
एकाच पदासाठी दोन विभागांनी दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिल्याचं समोर आलं. त्यावरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर आता नगर विकास विभागाने यू टर्न घेत अश्विनी जोशी यांचा आदेश काढलाच नसल्याचा खुलासा केला आहे.
बेस्ट हा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत विषय आहे. तर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांच्या सामान्य प्रशासन विभागालाही तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे दोन आदेश आल्यानंतर कोणता आदेश पाळायचा असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. त्यावर आता पडदा पडला असून सामान्य प्रशासन विभागाचा आदेश अंतिम राहणार आहे.
काय म्हटलंय नगरविकास खात्याने?
महाव्यवस्थापक, बेस्ट या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती अश्विनी जोशी यांच्याकडे सोपविण्याबाबतचे आदेश निर्गमित नाहीत. महाव्यवस्थापक, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) या पदाचा अतिरिक्त कार्यभार एस.व्ही.आर. श्रीनिवास (भाप्रसे) यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या 05 फेब्रुवारी, 2025 रोजीच्या आदेशान्वये यांच्याकडे सोपविण्यात आला होता. एस.व्ही. आर. श्रीनिवास, हे 31 जुलै, 2025 (म.नं) रोजी शासन सेवेतून नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
सामान्य प्रशासन विभागाचे 31 जुलै, 2025 रोजीचे आदेश विचारात घेता कामगार संघटनेचा मोर्चा हाताळण्याच्या दृष्टीने महाव्यवस्थापक या पदाचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी (भाप्रसे) यांच्याकडे सोपविण्याबाबत नगरविकास विभागामार्फत आदेश काढण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत होती.
तथापि, या दरम्यान सामान्य प्रशासन विभागामार्फत 05 ऑगस्ट, 2025 रोजीच्या आदेशान्वये महाव्यवस्थापक या पदाचा अतिरिक्त कार्यभार आशिष शर्मा (भाप्रसे) यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे नगरविकास विभागामार्फत महाव्यवस्थापक या पदाचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी, भाप्रसे यांच्याकडे सोपविण्याबाबतचे आदेश अधिकृतरित्या निर्गमित करण्यात आलेले नाहीत.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा