
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला झळ बसली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांचा अल्टिमेटम देत होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्यास सांगितले होते. मात्र इराण आपल्या भूमिकेवर ठाम असून सामुद्रधुनी खुली केलेली नाही. त्यामुळे आता अमेरिकेकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता वाढली आहे. अशातच अमेरिका मध्य आशियात 5000 हून अधिक सैनिक तैनात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हे अतिरिक्त सैन्य रवाना करण्यात आले असून, अमेरिकेने अतिरिक्त एफ-35 लढाऊ विमाने पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता युद्धभूमीत मोठं काहीतरी घडण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इराणच्या या भागावर अमेरिका ताबा घेणार?
अमेरिकेच्या या निर्णयाबाबत बोलताना एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेचे हे सैन्य केवळ दाखवण्यासाठी नाही, तर त्यामागे मोठी योजना आहे. खार्ग बेट आणि होर्मुज सामुद्रधुनी इराणच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा त्यांचा उद्देश आहे. या अधिकाऱ्याने असेही म्हटले की, खार्ग बेटावर अमेरिकेने नियंत्रण मिळवल्यास आणि इराणचा ताबा संपल्यास इराणची मोठी हानी होईल आणि तो वाटाघाटीसाठी तयार होईल. याच दृष्टीने आता अमेरिकेची वाटचाल पहायला मिळत आहे.
इराण प्रतिकार करणार
इराणच्या संरक्षण परिषदेने सोमवारी इशारा दिला की, जर जमिनीवरून हल्ला झाला, तर आम्ही संपूर्ण फारसच्या आखातातील समुद्रात स्फोटके (माइन्स) पेरू शकको. इराणच्या सीमेत अमेरिकन मरीन दल तैनात होण्याची शक्यता वाढत असताना हा इशारा देण्यात आला आहे. इराणच्या किनाऱ्यांवर किंवा बेटांवर हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास, इराण स्फोटके पेरण्याचा निर्णय घेऊ शकतो असं इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
होर्मुज सामुद्रधुनी सुरू करण्यावर अमेरिकेचा भर
दुसरीकडे, अमेरिका जहाज वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीला पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी अमेरिकन मरीन दल इराणच्या बेटांवर किंवा किनारी भागांवर उतरू शकते. इस्रायलनेही संकेत दिले आहेत की युद्धादरम्यान जमिनीवरील मोहिमेची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेंको यांनी सांगितले की रशिया आम्ही इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी सतत संपर्कात आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडल्यास इतरही देश या युद्धात उतरण्याची शक्यता आहे.