
आखातात सुरु असलेले युद्ध आता जगभर पसरायला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सतत हल्ले केले जात आहेत, तर इराणही पलटवार करत आखातातील अनेक देशांना टार्गेट करत आहे. अशातच आता हे युद्ध युरोपपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारण इराणने आक्रमक भूमिका घेत अमेरिकेच्या युरोपातील एका मित्र देशावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे युरोपसह संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. इराणच्या या धमकीमागे रशियाचाही हात असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेची युक्रेनवर हल्ला करण्याची धमकी
मध्यपूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे. अशातच आता इराणकडून अमेरिकेचा मित्र युक्रेनलाही धमकी देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धात युक्रेनने अमेरिका आणि इस्रायलला ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे मदत केल्याचे समोर आले आहे, त्यामुळे इराणने आता थेट युक्रेनवर हल्ला करण्याची भाषा केली आहे. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे युक्रेन आणि रशिया यांच्यातही सध्या युद्ध सुरू आहे, त्यामुळे इराणने युक्रेनवर हल्ला केल्यास युक्रेनचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
इराणने काय म्हटले?
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण संसदीय समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटले की, ‘अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने इराणविरोधी कारवायांमध्ये युक्रेन सहभागी झाल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलला ड्रोन सहाय्य देऊन युक्रेन प्रत्यक्षात या युद्धात सहभागी झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील कलम 51 नुसार, इराण आता युक्रेनवर हल्ला करू शकतो.’ इराणचा आरोप आहे की युक्रेन आपल्या ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे इस्रायल आणि पाश्चिमात्य देशांना मदत करत आहे.
युक्रेनचे प्रत्युत्तर
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणची ही धमकी ‘हास्यास्पद’ असल्याचे म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला की, इराणी ड्रोनचा सामना करण्यासाठी 10 पेक्षा जास्त देशांनी आमच्याकडे मदत मागितली आहे.रशियाविरुद्धच्या युद्धादरम्यान इराणी ड्रोन पाडण्याचा जो अनुभव युक्रेनकडे आहे, तो आज जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘आमच्याकडे जगातील सर्वोत्तम ड्रोन आहेत आणि आम्हाला युक्रेनच्या मदतीची काही गरज नाही.’