
इराणचं अमेरिका आणि इस्त्रायलसोबत भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे. होमूर्ज स्ट्रेट वाहतुकीसाठी बंद झाल्यानं जगभरात मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. कारण जगाला जेवढी कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. तर भारतामध्ये जेवढं कच्च तेल येतं, त्यातील सुमारे 40 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. मात्र सध्या इराणने हा मार्ग युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंद केला आहे, त्यामुळे अनेक देशातील जहाजं या मार्गावर अडकून पडले आहेत. संपूर्ण जग इंधन टंचाईच्या समस्येसोबत लढत असताना भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इराणने भारताचे दोन जहाजं या मार्गाने सोडली आहेत. यावर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं की, आमची इराणसोबत थेट चर्चा सुरू होती, त्याचा परिणाम म्हणून भारतीय जहाजांचा होर्मुज स्ट्रेटमधून जाण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक देशांना होमूर्ज स्ट्रेट ओपन
करण्यासाठी युद्धनौका पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. फायनांशियल टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जयशंकर यांनी म्हटलं की, भारत आणि इराणमध्ये थेट चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर शनिवारी भारतीय झेंडा असलेली दोन जहाजांनी होर्मूजच्या सामुद्रधुनीचा मार्ग सुरक्षितरित्या पार केला. माझी सातत्याने इराणसोबत चर्चा सुरू आहे, आणि त्याचे काही परिणाम देखील पहायला मिळत आहेत.
पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं की, सध्या आमची इराणसोबत चर्चा सुरू आहे. भारताची जहाज होमूर्जच्या सामुद्रधुनीमधून जाऊ द्यावीत यासाठी इराणसोबत भारताचा कोणताही करार झालेला नाही, आणि भारताची जहाज या मार्गाने जाऊ देण्याच्या बदल्यात भारताकडून इराणला काहीही मिळालेलं नाहीये. सध्या इराणसोबत चर्चा सुरू आहे. त्याचा परिणाम सुद्धा समोर येत आहे. ही प्रक्रिया सुरूच आहे. जर यामधून मार्ग निघाला तर आम्ही इराणसोबतची चर्चा सुरूच ठेवू. भारताची कायम हीच भूमिका आहे की, या समस्येवर चर्चेद्वारे तोडगा काढला जावा, जर दुसर्या देशांना देखील या प्रकरणात चर्चेचा मार्ग सापडला तर हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो असंही यावेळी जयशंकर यांनी म्हटलं आहे.