
उपांत्य फेरीत इंग्लंडच्या पराभवानंतर मायकल वॉनचा संताप, शिवम दुबेबाबत असं काही बोलून गेला; जर…Image Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना अतितटीचा झाला. या सामना कोणच्याच बाजूने झुकलेला नव्हता. शेवटच्या षटकापर्यंत काय होईल हे सांगता येत नव्हतं. टीम इंडियाला शेवटच्या षटकात 30 धावा रोखण्याचं आव्हान होतं. तर इंग्लंडला पाच षटकारांची गरज होती. अशा स्थितीत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू पार्ट टाइम बॉलर शिवम दुबेच्या हाती सोपवला. हा निर्णय घेतल्यानंतर क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली. कारण या स्पर्धेत शिवम दुबेची गोलंदाजी काही फारशी चालली नव्हती. त्यामुळे हा निर्णय अंगलट यायला नको असं वाटत होतं. त्यात अक्षर पटेलचं शेवटचं षटक शिल्लक होतं असं असूनही शिवम दुबेवर विश्वास टाकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होता. या षटकात शिवम दुबेने 22 धावा दिल्या. खरं तर हे खूपच महागडं षटक होतं. असं असूनही भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.
काय म्हणाला मायकल वॉन?
सामन्यात टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने रोखठोक मत मांडलं आहे. त्याने सांगितलं की, ‘ते सामना जिंकले. पण मी त्या निर्णयाशी सहमत नाही. अक्षर पटेल एक चांगला गोलंदाज आहे. तो सरळ आणि वाइड यॉर्कर टाकू शकतो. शिवम दुबेने मागच्या 3 षटकात 68 धावा दिल्या आहेत. जर त्याने भारतासाठी आणखी षटक टाकलं असतं तर भारत वर्ल्डकपमधून बाहेर असता. जर रविवारी त्याने गोलंदाजी केली तर खूपच वाईट स्थिती असेल.’ मायकल वॉनच्या या इशाऱ्यानंतर अंतिम फेरीत सूर्यकुमार यादव काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागून असेल. त्याला गोलंदाजी देईल की नाही हे सांगणं कठीण आहे.
मायकल वॉनच्या मते, ‘क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी सरळ आणि साध्या ठेवल्या पाहीजेत. जर तुमच्याकडे अक्षर पटेल सारखा अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे टाकण्यासाठी बरंच काही आहे. स्ट्राईकला लेफ्ट हँडर होता, पण दुसऱ्या बाजूला जेमी ओव्हरटन होताच. तुम्हाला अनुभवी गोलंदाजाला संधी देणं गरजेच आहे.’