Headlines

दोन वर्षांचं प्रेम, एक संशय अन् राणीचा दी एंड; पोलिसांनी 15 दिवसात कसा लावला छडा?

दोन वर्षांचं प्रेम, एक संशय अन् राणीचा दी एंड; पोलिसांनी 15 दिवसात कसा लावला छडा?
दोन वर्षांचं प्रेम, एक संशय अन् राणीचा दी एंड; पोलिसांनी 15 दिवसात कसा लावला छडा?


यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. ही हत्या की आत्महत्या, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. आता यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने या प्रकरणाचा तपास करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकरानेच आपल्या अल्पवयीन भावाच्या मदतीने हा निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मृत तरुणीचे नाव राणी किशोर वानखडे (२६) असे असून ती काही काळापासून पतीपासून विभक्त राहत होती. याच काळात तिची ओळख सतीश रमेश कश्यप याच्याशी झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सतीशने राणीला उदरनिर्वाहासाठी पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला लावून दिले होते. मात्र, राणीचे पुण्यात दुसऱ्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय सतीशला येऊ लागला. या संशयाचे रूपांतर रागात झाले आणि त्याने राणीचा काटा काढण्याचे ठरवले.

सतीशने राणीला पुण्यातून यवतमाळला बोलावून घेतले. त्यानंतर तिला जोडमोहा परिसरातील निर्जन तासलोट जंगलात नेले. तिथे सतीशने तिचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर तिची ओळख पटू नये आणि कोणताही पुरावा उरू नये, यासाठी त्याने राणीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. या संपूर्ण कृत्यात सतीशला त्याच्या अल्पवयीन भावानेही साथ दिल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होते, मात्र स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. यानंतर पोलिसांचा सतीशवर संशय बळावला. या संशयावरून त्यांनी सतीश कश्यपला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी सतीश कश्यप आणि त्याच्या साथीदार भावाला ताब्यात घेतले असून सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

नागपुरात विद्यार्थिनीची आत्महत्या

तर दुसरीकडे नागपूरच्या हिंगणा परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय विध्येश्वरी आपटे या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. विध्येश्वरी ही हिंगणा येथील आकार नर्सिंग कॉलेजमध्ये अंतिम वर्षाला शिक्षण घेत होती. ती डीएनडी हाईट्समधील एका फ्लॅटमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत राहत होती. विध्येश्वरीच्या प्रियकराचे दोन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती.

आत्महत्येपूर्वी तिने आपल्या प्रियकराला व्हिडीओ कॉल केला होता आणि त्या दरम्यानच तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही दिवसांपासून ती मानसिक तणावात होती, अशी चर्चा मित्रपरिवारात सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक पुरावे आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड्सचा तपास केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *