‘धुरंधर’मधल्या या एका गाजलेल्या डायलॉगसाठी सनी देओलला मिळाली रॉयल्टी?

‘धुरंधर’मधल्या या एका गाजलेल्या डायलॉगसाठी सनी देओलला मिळाली रॉयल्टी?
‘धुरंधर’मधल्या या एका गाजलेल्या डायलॉगसाठी सनी देओलला मिळाली रॉयल्टी?


अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या करिअरमधील 2.0 टप्प्याचा आनंद घेत आहे. कारण एकानंतर एक त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. ‘गदर 2’, ‘जाट’ आणि आता ‘बॉर्डर 2’ या चित्रपटांच्या यशासह तो बॉलिवूडवर पुन्हा एकदा राज्य करतोय. सनी देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फिल्म इंडस्ट्रीतील त्याच्या लांबलचक प्रवासाविषयी आणि करिअरमधील चढउतारांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याचवेळी त्याने मेगा ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’ या चित्रपटावरही प्रतिक्रिया दिली. या चित्रपटातील एका डायलॉगबद्दल रॉयल्टी मिळाल्याच्या चर्चांवर त्याने मौन सोडलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सनी देओल बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे आणि आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने अनेक चढउतार पाहिले आहेत. बॉलिवूडच्या या झगमगत्या विश्वात यश आणि अपयश येत-जात राहतं, परंतु कलाकाराची खरी ताकद ही मेहनत आणि कामाप्रती प्रामाणिक राहण्यात आहे, असं मत सनीने नोंदवलं. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सनीने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटावरही प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटातील एक डायलॉग तुफान व्हायरल झाला आहे. ‘घायल हूँ, इसलिए घातक हूँ’ असा हा डायलॉग आहे. सनी देओलच्या ‘घायल’ आणि ‘घातक’ या जुन्या चित्रपटांच्या नावांवरून हा डायलॉग लिहिण्यात आला आहे.

या मुलाखतीत जेव्हा सनी देओलला विचारलं गेलं की ‘धुरंधर’च्या निर्मात्यांनी तुझ्या चित्रपटांचे शीर्षक वापरण्यासाठी तुला रॉयल्टी दिली का, तेव्हा तो हसत म्हणाला, “नाही, आमचे दिग्दर्शक खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी माझे घायल आणि घातक चित्रपट पाहिले आणि त्या चित्रपटांप्रती एक आदर भावना म्हणून त्यांनी असा डायलॉग लिहिला. त्यांनी अशा पद्धतीने टायटल्स वापरणं ही खूपच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. त्यासाठी मी कोणतीही रॉयल्टी स्वीकारली नाही किंवा त्यांनी दिली नाही म्हणून मी नाराजही नाही.”

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आणि इतिहास रचला आहे. आता 19 मार्च 2026 रोजी ‘धुरंधर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *