
उन्हाळा सुरु झाला की शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी केवळ साधे पाणीच नव्हे तर नारळाचे पाणी आणि इतर अनेक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबाच्या पाण्याचाही सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचबरोबर नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते उन्हाळ्यासाठी एक उत्तम पेय मानले जाते. आता प्रश्न असा आहे की या दोन्ही पेयांपैकी उन्हाळ्यात अधिक फायदेशीर कोणते आहे? बहुतेक लोकं नारळाच्या पाण्याऐवजी लिंबाच्या पाण्याला पसंती देतात. मात्र शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी नारळाचे पाणी हा देखील एक उत्तम पर्याय आहे.
ज्येष्ठ आहारतज्ञ यांनी सांगितले आहे की उन्हाळ्यात नारळाचे पाणी प्यावे की लिंबाचे पाणी, यापैकी कोणते पेय पिणे अधिक चांगले आहे. तसेच त्यातील घटक, ते कसे प्यावे आणि त्याचे फायदे याबद्दलही जाणून घेऊयात.
नारळाच्या पाण्यातील घटक
उन्हाळ्यात नारळपाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यातील इलेक्ट्रोलाइट्सचे गुणधर्म. या फायद्यामुळे कडक उन्हात देखील दिवसभर शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. नारळपाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियमसारखे घटकही असतात. हे सर्व घटक शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यापासून ते स्नायू तयार करण्यापर्यंत अनेक फायदे देतात. नारळपाण्यात नैसर्गिक साखर असते, पण ते कमी कॅलरीयुक्त पेय असल्यामुळे वजन नियंत्रणासाठी एक उत्तम पेय ठरते. त्यात कर्बोदकेही असतात आणि हे नारळ पाणी प्यायल्याने त्वरित ऊर्जा मिळते.
लिंबू सरबताचे घटक
लिंबूपाण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातील व्हिटॅमिन सी. या स्वस्त आणि घरगुती पेयात इतरही अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्येष्ठ आहारतज्ञ सांगतात की व्हिटॅमिन सी केवळ रोगप्रतिकारशक्तीच मजबूत करत नाही, तर उन्हामुळे त्वचेचं संरक्षण करते. लिंबामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात, त्यामुळे ते आपल्या शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवते. तसेच हे एक कमी कॅलरी असलेले पेय आहे.
लिंबाचं पाणी की नारळाचं पाणी उन्हाळ्यात अधिक फायदेशीर काय आहे?
ज्येष्ठ आहारतज्ञ यांच्या मते दोन्ही पेयं आपापल्या परीने फायदेशीर आहेत. नारळाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ते डिहायड्रेशन, अशक्तपणा व उष्माघातातून लवकर बरे होण्यास मदत करते. दुसरीकडे लिंबाच्या सरबतामध्ये व्हिटॅमिन सी मिळते आणि हे शरीराला ताजेतवाने करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त पचनक्रिया देखील सुधारते.
तज्ज्ञ पुढे सांगतात की तीव्र उष्णता किंवा जास्त घाम येत असताना नारळाच्या पाण्यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचा चांगला पुरवठा होतो. दररोज शरीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी लिंबु सरबत देखील प्रभावी आहे. त्यामुळे हे दोन्ही पेयांचा तुमच्या आहारात समावेश करावा.
हे दोन्ही पेय पिण्याच्या योग्य वेळेबद्दल बोलायचे झाले तर तज्ज्ञ गीतिका यांच्या मते, ते रिकाम्या पोटी किंवा सकाळच्या मधल्या वेळेत पिणे सर्वोत्तम आहे. त्यांच्या मते दिवसाची सुरुवात नारळाच्या पाण्याने केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. इतकेच नाही, तर उन्हाळ्यात उष्माघाताच्या धोक्यांपासून शरीराचे संरक्षण करण्यासही ते मदत करते.
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही दुपारनंतरही डिटॉक्स ड्रिंक्स पिऊ शकता. त्यांच्या मते, उन्हाळ्यातील दुपारच्या उष्णतेनंतर शरीराला थंडावा आणि इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. या वेळी नारळाचे पाणी, आवळ्याचे पाणी, पुदिना-लिंबू पाणी किंवा सब्जा ड्रिंक्सचे सेवन केले जाऊ शकते. यामुळे तुमचे शरीर हायड्रेशन आणि खनिजांचे संतुलन राखू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)