Headlines

पत्नीच्या दागिन्यांवर पतीचा किती अधिकार? प्रत्येक पुरुषाला याची माहिती असायलाच हवी

पत्नीच्या दागिन्यांवर पतीचा किती अधिकार? प्रत्येक पुरुषाला याची माहिती असायलाच हवी
पत्नीच्या दागिन्यांवर पतीचा किती अधिकार? प्रत्येक पुरुषाला याची माहिती असायलाच हवी


भारतीय संस्कृतीत सोन्याच्या दागिन्यांना केवळ अलंकार म्हणून नाही तर स्त्रीधन म्हणून विशेष महत्त्व आहे. अनेकदा कौटुंबिक अडचणी, कर्जबाजारीपणा किंवा व्यसनाधिनतेमुळे पती पत्नीचे दागिने तिच्या संमतीशिवाय विकतो किंवा गहाण ठेवतो. मात्र, अशा प्रकरणांत पतीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. भारतीय कायदा पत्नीच्या या मालमत्तेचे संरक्षण कशा पद्धतीने करते, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

स्त्रीधन म्हणजे काय?

हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ च्या कलम १४ नुसार, लग्नापूर्वी, लग्नाच्या वेळी किंवा बाळंतपणासारख्या प्रसंगी स्त्रीला मिळालेले सर्व दागिने, रोकड आणि भेटवस्तू म्हणजे ‘स्त्रीधन’ होय. या मालमत्तेवर स्त्रीची पूर्ण आणि अनन्य मालकी असते. ती ही मालमत्ता तिच्या इच्छेनुसार खर्च करू शकते किंवा कोणालाही देऊ शकते.

पतीने दागिने विकल्यास कोणते कायदे लागू होतात?

१. भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४०५ आणि ४०६:

जर पतीने पत्नीचे दागिने स्वतःच्या ताब्यात घेऊन तिचा विश्वासघात केला आणि ते दागिने तिच्या परवानगीशिवाय विकले, तर तो गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात मानला जातो. यासाठी ३ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

२. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, २००५:

पत्नीला तिच्या स्त्रीधनापासून वंचित ठेवणे, ते जबरदस्तीने काढून घेणे किंवा तिच्या परवानगीशिवाय त्याची विल्हेवाट लावणे हा आर्थिक छळ (Economic Abuse) मानला जातो. या कायद्यांतर्गत पीडित महिला न्यायालयाकडून आपले दागिने परत मिळवण्यासाठी आदेश मिळवू शकते.

सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंतच्या विविध खटल्यांमध्ये स्पष्ट केले आहे की, जरी पत्नीने तिचे दागिने सुरक्षिततेसाठी पती किंवा सासरच्या लोकांच्या ताब्यात दिले असले, तरी त्याचा अर्थ तिने मालकी हक्क सोडला असा होत नाही. सासरचे लोक केवळ त्याचे विश्वस्त (Trustees) असतात, मालक नव्हे. जर पतीने किंवा सासरच्यांनी दागिने परत करण्यास नकार दिला किंवा ते विकले, तर पत्नी पोलिसांत तक्रार दाखल करू शकते.

कौटुंबिक न्यायालयातून स्त्रीधन परत मिळवण्यासाठी दावा दाखल करता येतो. दागिन्यांची यादी, पावत्या किंवा लग्नातील फोटो पुरावा म्हणून सादर केल्यास कायदेशीर प्रक्रिया अधिक सुलभ होते. थोडक्यात सांगायचे तर स्त्रीधन हा पत्नीचा कायदेशीर सुरक्षा कवच आहे. पतीला कितीही आर्थिक चणचण असली, तरी पत्नीच्या स्पष्ट संमतीशिवाय तिच्या दागिन्यांना हात लावणे त्याला किंवा सासरच्यांना महागात पडू शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *