
आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत तल्लीन झाला आहे. 'बम बम भोले' आणि 'ॐ नमः शिवाय'च्या जयघोषाने राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्व लहान-मोठी शिवमंदिरे दुमदुमून गेली आहेत.
पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरांबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहे. सध्या प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील बोरटेंभे येथे असलेल्या 'राज राजेश्वरी धाम' मंदिरात भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे.
संपूर्ण भारतात मोजक्याच ठिकाणी असलेली स्फटिक शिवपिंडी येथे आहे. महाशिवरात्रीनिमित्त या स्फटिक शिवलिंगाला पहाटे आकर्षक सजावट करून आरती करण्यात आली. हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त येत असून, देवस्थानतर्फे ३०० किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटण्यात येत आहे.
घृष्णेश्वर (वेरूळ) याठिकाणी परराज्यातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. तर परळीत प्रभू वैद्यनाथाची दागदागिन्यांनी मढवलेली अलंकारिक महापूजा करण्यात आली. सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे.
नाशिकच्या त्र्यंबक नगरीत भाविकांचा महासागर लोटला असून संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच भीमाशंकर येथे विकास आराखड्याचे काम सुरू असल्याने मंदिर भाविकांसाठी बंद असले, तरी परंपरेनुसार शासकीय महापूजा पार पडली. यामुळे भाविकांनी पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक पेशवेकालीन मंदिरांकडे धाव घेतली आहे.
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिरात मध्यरात्रीपासूनच २ ते ३ किलोमीटरच्या लांब रांगा लागल्या आहेत. उन्हाचा तडाखा लक्षात घेता प्रशासनाने भाविकांसाठी पाण्याची सोय केली आहे.
तर अंबरनाथ येथील ९६६ वर्षे जुन्या प्राचीन शिवमंदिरात बनारसवरूनही भक्त दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव यंदा गाभाऱ्याबाहेरूनच दर्शन दिले जात आहे. धाराशिवमधील उमरगा शहरातील ऐतिहासिक महादेव मंदिरात पहाटे अभिषेक आणि रुद्राभिषेक संपन्न झाले.
बीडच्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे पहाटे ४ वाजेपासून भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच १२ व्या शतकातील प्राचीन कनकालेश्वर मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. जळगावात ३०० वर्षांची परंपरा असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात पहाटेपासून विधीवत पूजा करण्यात आली.
रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार आहे. पुण्यात मुठा नदीकाठच्या ओंकारेश्वर मंदिरात शंखनाद आणि फुलांच्या सजावटीने भाविकांचे स्वागत करण्यात आले.
राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये आज भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, प्रशासकीय यंत्रणा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज आहे.