
S. jaishankarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
मध्य पूर्वेत सध्या युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा 10 वा दिवस आहे. युद्ध पुढील काही दिवस असंच सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणने एकही अट न ठेवता शरण यावं अशी मागणी त्यांनी केली होती, इराणने ट्रम्प यांची ही मागणी धुडकावून लावली आहे. त्यामुळे चिडलेल्या अमेरिकेनं आता इराणवर हल्ले वाढवले आहेत, दुसरीकडे इस्त्रायलकडून देखील इराणवर हल्ले सुरूच आहेत, आता अमेरिकेकडून इराणचे तेलसाठे लक्ष्य करण्यात येत आहेत. यामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भारताच्या इराणसंदर्भातील धोरणांवरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू असतानाच आता इराणने थेट भारताचे आभार मानले आहेत. भारतामधून इराणकडे परतणाऱ्या इराणच्या एका युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणीबुडीने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये ही युद्धनौका बुडाली. या युद्धनौकेमधील 87 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यानंतर लगेचच इराणकडून त्यांची दुसरी एक युद्धनौका IRIS लवनला भारताच्या कोची बंदरात डॉक करण्याची परवानगी इराणकडून मागण्यात आली होती. भारतानं इराणाला त्यांची युद्धनौका IRIS लवनला कोची बंदरात डॉक करण्याची परवानगी दिली, त्यामुळे इराणने भारताचे आभार मानले आहेत.
भारताने परवानगी दिल्यामुळे इराणने भारताचे आभार मानले आहेत, भारताचं हे पाऊल मानवतावादी असल्याचं इराणने म्हटलं आहे. याबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत माहिती दिली. याबाबत माहिती देताना जयशंकर यांनी म्हटलं की सध्या इराणमध्ये परिस्थिती बिघडली आहे, त्यामुळे इराणसोबत उच्चस्तरीय संपर्क ठेवणे कठीण बनलं आहे. परंतु उपलब्ध माध्यमांद्वारे इराणसोबत भारताचा राजनैतिक संवाद सुरू आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी 20 फेब्रुवारी रोजी आणि त्यानंतर युद्ध सुरू झाल्यानंतर 5 मार्च रोजी इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांच्यासोबत बोलणं झालं होतं, त्यानंतर आपण त्यांच्या जहाजांना कोची बंदारात डॉक करण्याची परवानगी देखील दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना इराणने भारताचे आभार मानले असून, भारताचा हा मानवतावादी दृष्टीकोण असल्याचं इराणने म्हटलं आहे, अशी माहिती एस. जयशंकर यांनी दिली आहे. दरम्यान भारतानं घेतलेली ही भूमिका अमेरिकेसाठी धक्का मानला जात आहे. भारतानं आपल्या कृतीतून ट्रम्प यांना धक्का दिला आहे.