
सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? प्रत्येक व्यक्तीला चमकदार आणि तरुण त्वचा हवी असते . मात्र आपली सध्याची धावपळीची जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आपल्यापैकी बहुतेक जण निरोगी त्वचा टिकवण्यासाठी महागड्या स्किन केअर प्रोडक्टवर आणि सीरमवर हजारो रुपये खर्च करतात. पण आजच्या लेखात आपण घरी आणलेल्या संत्र्याच्या सालीपासून एकही पैसा खर्च न करता तेही अगदी सोप्या पद्धतीने घरी व्हिटॅमिन सी-युक्त सीरम बनवू शकता. चला तर मग आजच्या लेखात घरी सीरम कसे बनवायचे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.
संत्र्याच्या सालींपासून व्हिटॅमिन सी-युक्त सीरम बनवणे अगदी सोपे आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहित आहे की, संत्र्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे केवळ चेहऱ्यावरील डाग कमी करत नाहीत, तर सुरकुत्यांना प्रतिबंध करण्यास आणि त्वचा घट्ट करण्यास देखील मदत करतात.
या पद्धतीने घरी व्हिटॅमिन सी-युक्त अँटी-एजिंग सीरम तयार करा
हे सीरम बनवण्यासाठी तुम्हाला संत्र्याची साल, गुलाबजल, कोरफड जेल, ग्लिसरीन, व्हिटॅमिन ई कॅप्सूल या गोष्टी लागतील.
स्टेप 1: संत्र्याच्या सालीची पावडर – सर्वप्रथम संत्री स्वच्छ धुवा. त्यांची साल काढा आणि शक्य तितका सालीच्या आतील पांढरा गर काढून घ्या. त्यानंतर या साली उन्हात वाळवा. किंवा तुम्ही त्या ओव्हनमध्ये अगदी कमी तापमानावर देखील सुकवू शकता. आता या साली उन्हात सुकल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर बनवा आणि चाळून घ्या.
स्टेप 2: व्हिटॅमिन सी- एका भांड्यात प्रत्येकी एक चमचा संत्र्याची पावडर आणि गुलाबजल मिक्स करून झाकून ठेवा आणि काही तास तसेच राहू द्या. या वेळेत गुलाबजल सालींमधील सर्व व्हिटॅमिन सी शोषून घेईल. ते एका पातळ कॉटनच्या कापडातून किंवा चाळणीतून गाळून घ्या. यातून मिळणारा रस हेच खरे व्हिटॅमिन सी आहे.
स्टेप 3: सीरम- आता या रसात कोरफड जेल आणि ग्लिसरीन योग्य प्रमाणात मिक्स करा. नंतर व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल त्यात टाका. किंचित घट्ट जेल तयार होईपर्यंत ते चांगले फेटून घ्या. अशाप्रकारे तुमचा घरगुती पद्धतीने अगदी सोप्या प्रकारे व्हिटॅमिन सी-युक्त अँटी-एजिंग सीरम तयार आहे.
सीरम कसे वापरावे
हे सीरम एका गडद काचेच्या बाटलीत ठेवा. ते नेहमी फ्रिजमध्ये ठेवा, कारण या घरगुती सीरममध्ये कोणतेही रसायन नाही आणि ते बाहेर लवकर खराब होऊ शकते. रात्री चेहरा धुतल्यानंतर, चेहऱ्यावर 3-4 थेंब लावा आणि हळुवारपणे वरच्या चेहऱ्यावर मसाज करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)