
Strait Of Hormuz : अमेरिका-इस्रायलसोबत युद्ध सुरू असल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक व्यापारासाठी एक महत्त्वाचा जलमार्ग आहे. जगातील एकूण गरजेपैकी 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या जलमार्गातून होते. भारतही साधारण 40 ते 50 टक्के कच्चे तेल याच मार्गाने आयात करतो. अमेरिकेची कोंडी करण्यासाठी इराणने सामुद्रधुनीचा हा मार्गच बंद केला आहे. इराणच्या परवानगीशिवाय या मार्गातून एकही जाहाज जाऊ शकत नाही. त्यामुळेच भारत, पाकिस्ता, चीन यासह अनेक महत्त्वाच्या देशांत उर्जेचं संकट निर्माण झालं आहे. सध्याच युद्ध थांबण्याची शक्यता नसल्यानं हे संकट अधिक गहिरं होणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, एकीकडे इंधन टंचाईची भीती व्यक्त केली जात असताना आता भारत तसेच जगातील इतरही देशांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
कतारच्या जहाजांना दिला मार्ग
नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यासाठी जागतिक पातळीवर कतार हा खूपच महत्त्वाचा देश आहे. भारतासह इतरही अनेक बड्या देशांना कतार नैसर्गिक वायू पुरवतो. आकडेवारीत सांगायचे झाले तर जगाच्या एकूण गरजेपैकी साधारण 20 टक्के नैसर्गिक वायू कतारकडून समस्त जगाला पुरवले जाते. परंतु इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने या देशातून इतर देशांना नैसर्गिक वायुचा पुरवठा होत नव्हता. सगळा व्यापार ठप्प पडला होता. परंतु आता हा व्यापार पुन्हा पूर्ववत सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
इराणने काय निर्णय घेतला?
मिळालेल्या माहितीनुसार सध्या सुरू असलेल्या युद्धामध्ये इराणने पहिल्यांदाच कतारची जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देण्यास परवानगी दिली आहे. इराणच्या आयआरजीसीने परवानगी दिल्यामुळे ही दोन्ही जहाजे आता आपापल्या इप्सित स्थळी जाणार आहेत. या दोन्ही जहाजांची नावे रसिदा आणि अल दयीन अशी आहेत. ही जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे अगोदर ओमानच्या खाडीत जातील. त्यानंतर ज्या देशांनी नैसर्गिक वायूंची ऑर्डर दिलेली आहे, त्या देशांत ही जहाजे जातील.
भारतासह जगाचे टेन्शन मिटणार
दरम्यान, कतारच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी मिळाल्यानंतर जगाची आशा पल्लवीत झाली आहे. भविष्यात कतारच्या इतरही जहाजांना इराण परवानगी देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे शक्य झाले तर भविष्यात भारतातही नैसर्गिक वायूने भरलेली जहाजे येऊ शकतात. त्यामुळे नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.