
राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या ७३१ जागा आणि १२५ पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील उमेदवार हे अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिंतीत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
अजित पवार गटाचा पहिला विजय
सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. या ठिकाणी भोसरे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवून राज्याला पहिला निकाल दिला आहे. हा विजय अजित पवार गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण माढा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा राणसंग्राम राहिला आहे. अश्विनी दळवी यांच्या विजयामुळे या भागातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पक्षनिहाय सविस्तर कल
| पक्ष | आघाडी/विजयी जागा | सद्यस्थिती |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | ७० | राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर. |
| राष्ट्रवादी (अजित पवार गट) | ४३ | पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर पुण्यात जोरदार मुसंडी. |
| शिवसेना (एकनाथ शिंदे गट) | ३८ | कोकण आणि मराठवाड्यात चांगली कामगिरी. |
| काँग्रेस (INC) | २१ | विदर्भ आणि लातूर भागात काही ठिकाणी आघाडी. |
| शिवसेना (उद्धव ठाकरे गट) | १४ | कोकणात काही ठिकाणी संघर्ष, परभणीत आघाडी. |
| राष्ट्रवादी (शरद पवार गट) | ०३ | सुरुवातीच्या कलात पिछाडीवर. |
| इतर/अपक्ष | ११ | स्थानिक आघाड्यांचा प्रभाव. |
विभागीय कुठे कोणाला कल?
कोकण (सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी)
- महायुतीने मतमोजणीपूर्वीच २७ जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. यात सिंधुदुर्गाती ८ जिल्हा परिषद आणि १७ पंचायत समितींचा समावेश होता.
- रत्नागिरीत नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे गटाच्या डॉ. पद्मजा कांबळे विजयी झाल्या आहेत.
- महाडमध्ये अनिल जाधव (शिंदे गट) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर)
- पुणे: जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळमध्ये टपाली मतदानात अजित पवार गटाचे वर्चस्व आहे.
- सांगली: भाजप १० जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी (अजित पवार) २ जागांवर आहे.
- सातारा: पाटणमध्ये शंभूराज देसाईंच्या नेतृत्वात शिवसेनेने खाते उघडले असून मंगल माने विजयी झाल्या आहेत.
मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव)
- लातूरमध्ये काँग्रेसने सुरुवातीला चांगली मुसंडी मारली आहे.
- परभणीत पिंगळी गटात ठाकरे गट आघाडीवर आहे, तर जिंतूर-भोगाव गटात शरद पवार गटाचे कृष्णा देशमुख आघाडीवर आहेत.