
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना जगभरातील विविध कंटेंट पहायला मिळतो. चित्रपट, वेब सीरिज, अॅनिमेटेड चित्रपट, शॉर्ट फिल्म्स.. तुम्हाला जे हवं ते एका क्लिकवर उपलब्ध होतं. परंतु जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवातच झाली होती आणि त्यावेळी मर्यादित प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होते, तेव्हा युट्यूबवर काही सीरिज लोकप्रिय झाल्या होत्या. अशाच एका सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 9.1 रेटिंग मिळाली आहे. विशेष म्हणजे या सीरिजला प्रदर्शित होऊन आता दहा वर्षे झाली आहेत, तरीसुद्धा त्यातील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत, लोकप्रिय आहेत. या सीरिजचं नाव आहे ‘पिचर्स’ असून ‘टीव्हीएफ’ म्हणजेच ‘द व्हायरल फिव्हर’ने त्याची निर्मिती केली होती. टीव्हीएफच्या युट्यूब चॅनलवर ही सीरिज पहायला मिळेल.
स्टार्टअपची कथा
2015 मध्ये जेव्हा ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, तेव्हा भारतात ओटीटीची नुकतीच सुरुवात झाली होती. युट्यूबवरच या सीरिजला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजमध्ये चार तरुण बिझनेसमेनची कथा दाखवण्यात आली होती, जे त्यांच्या रोजच्या नोकरीव्यतिरिक्त काहीतरी वेगळा स्टार्टअप करू इच्छित होते. नवीन बंसल, योगेश पांडे आणि सौरभ मंडल हे तिघे चांगले मित्र असतात आणि तिघंही वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करत असतात. परंतु या सीरिजच्या कथेत आणखी एक हिरो आहे, तो म्हणजे जितेंद्र महेश्वरी. जितेंद्र चांगले पैसे कमवत असतो आणि नुकताच लग्न करून मुंबईत येतो. हे चारही मित्र मिळून त्यांच्या स्टार्टअपचं स्वप्न पाहतात आणि सतत गुंतवणूकदारांसमोर पिच (स्टार्टअपचा एकूण प्लॅन) सादर करतात. चार मित्रांचं स्वप्न आणि आयुष्याचं कटू सत्य याला ही सीरिज अधोरेखित करते. आजसुद्धा या कथेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळतंय. तुम्ही आता ही सीरिज झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहू शकता.
‘द व्हायरल फिव्हर’ नावाच्या प्रॉडक्शन हाऊसने 2015 मध्ये ही सीरिज बनवली होती. त्यावेळी तर ही सीरिज हिट झालीच होती, परंतु आता दहा वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. नंतर टीव्हीएफनेही एकानंतर एक दमदार सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणले. हे सर्व सीरिज युट्यूबवर सहज उपलब्ध आहेत.