कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) PF काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे पगारदार नोकरदारांना मोठा फायदा होणार आहे, विशेषतः ज्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. नव्या नियमानुसार, कर्मचारी आता त्यांचे पहिले घर खरेदी करण्यासाठी, बांधण्यासाठी किंवा गृह कर्जाचा EMI भरण्यासाठी त्यांच्या PF खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकतात. या सुविधेसाठी पूर्वी पाच वर्षांची सेवा आवश्यक होती, पण आता ही अट कमी करून तीन वर्षांच्या सेवेवर आणली आहे. त्यामुळे, आता तीन वर्षांच्या सेवेनंतरही कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. ही सुविधा कर्मचाऱ्याला आयुष्यात फक्त एकदाच घेता येणार आहे. या बदलामुळे नोकरदारांना घर खरेदीसाठी आर्थिक मदत मिळवणे अधिक सुलभ झाले आहे.