
मुंबई: मनसेमध्ये (MNS) प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. इगतपुरी (Igatpuri) येथे झालेल्या मनसेच्या शिबिराला (MNS Camp) प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आले नव्हते. यावरून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. या नाराजीची दखल घेत मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी प्रकाश महाजन यांना फोन करून त्यांच्याशी बातचीत केली. त्यानंतर काल (बुधवारी, ता-17) सकाळी मनसेचे (MNS) आणखी एक नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनीही प्रकाश महाजन यांच्याशी संपर्क साधला. प्रकाश महाजन यांनी आपली नाराजी अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना सविस्तरपणे समजावून सांगितली. त्या नाराजीनाट्यानंतर आज प्रकाश महाजन यांची आणि अमित ठाकरे यांची भेट झाली.
भेटीनंतर एबीपी माझाशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, माझा राग मावळला आहे. पक्षाने अमित ठाकरेंसारखं बोलणं ऐकून घेणारं, समजून घेणारं व्यासपीठ दिलं. अत्यंत समाधानाने मी खाली उतरलो आहे , त्याच ताकदीने मनसेमध्ये काम करेन. योग्य ती दखल घेऊ असं देखील सांगण्यात आलं आहे. शिबिराची प्रसिद्धी वेगळ्या अर्थाने झाली, शिबिराचा अर्थच वेगळा होता. अमित ठाकरे यांचा फोन आल्यानंतर सगळ्याच राग निवळला होता, त्यानंतर आज देखील बोलणं झालं, त्यांनी माझ्या सर्व गोष्टी आणि राग अगदी समजंसपणे समजून घेतल्या, असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
पक्षात अंतर्गत व्यासपीठ फार गरजेच असतं
मला त्यांचा फोन आला त्याच दिवशी बऱ्याचशा गोष्टी शांत झाल्या होत्या. त्यानंतर आज प्रत्यक्ष भेट झाली सविस्तरपणे बोलणं झालं. इतक्या तरुण वयात कसं संयमीकपणे समोरच्या माणसाचा संताप ऐकून घेणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. ज्येष्ठ नेता, किंवा पक्षातील इतर नेत्यांना कार्यकर्त्यांना किंवा इतर सर्वांना एक अमित ठाकरे नावाचं व्यासपीठ मिळालं जिथे आम्ही आमचं मत व्यक्त करू शकतो. पक्षाने कसं वागावं, कसं वागू नये, आमचं काय मत आहे, हे जाणून घेणं फार गरजेचं असतं. कुठल्याही संघटनेत कुठल्याही पक्षात अंतर्गत व्यासपीठ फार गरजेच असतं, जे आज आम्हाला अमित ठाकरे यांच्या रूपाने मिळाला आहे, असंही पुढे प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
तो गैरसमज आता दूर झालेला आहे
इगतपुरीच्या मेळाव्याला न बोलावल्याने ही नाराजी होती, त्याबाबत काय चर्चा झाली? या प्रश्नावर उत्तर देताना प्रकाश महाजन म्हणाले, त्याबद्दल मला त्यांनी सांगितलं, ते शिबिर कोणत्या गोष्टीसाठी होतं, काय होतं, त्याची जी प्रसिद्धी झाली ती वेगळ्या प्रकारची होती. त्यामुळे आमच्या सर्वांचा गैरसमज झाला होता. तो गैरसमज आता दूर झालेला आहे. यापुढे कशी वागणूक देतात. त्याचबरोबर अमित ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्यामुळे माझे म्हणण्याला ते राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा निर्णय होईल असं मला वाटतं असे ते पुढे म्हणालेत.
आणखी वाचा