
मुंबई : मी काय तुला घाबरतो का, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध चक्क विधानभवन परिसरातील लॉबीमध्ये भिडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, पडळकर समर्थकांकडून जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता असल्याच्या नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर, दोन्ही बाजूने शिवीगाळ झाल्याचं पाहायला मिळाल, यावेळी येथील सुरक्षा रक्षकांनी पुढे येत ही भांडणे सोडवली. मात्र, तोपर्यंत घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, विरोधकांकडून घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत असून मला मारण्याचा प्रयत्न झाल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आता, या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात कालच गाडीचा दरवाजा उघडण्यावरुन वाद झाला होता. यावेळी, दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर, गेल्याच आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा परिसरातच अरे मंगळसुत्र चोराचा.. अशी घोषणाबाजी केल्याने दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू होते. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या राड्याचे पडसाद आज चक्क विधानभवन लॉबी, परिसरात पाहायला मिळाले. त्यावरुन, येथील आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला असून थेट विधानसभा अध्यक्षांकडेही याबाबत मागणी करण्यात आली आहे. विरोधकांनी देखील या घटनेवरुन गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. आता, स्वत: मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
विधिमंडळ परिसरात झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येत प्रतिक्रिया दिली. घडलेली घटना योग्य नाही, मारामारी करणं, विधानभवनात करणं योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींच्या अंतर्गत हा परिसर येतो, त्यांनी घटनेची दखल घ्यावी. अध्यक्षांनी कडक कारवाई करावी, अशी विनंती मी केली आहे. हे विधानसभेला शोभणारं नाही, त्यामुळे कारवाई झालीच पाहिजे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी घडलेल्या प्रकारावर आपली भूमिका स्पष्ट केली.
उद्धव ठाकरेंची मागणी, गुंडांच्या पोशिंद्यावरती कारवाई करा
विधानसभा परिसरातील राड्यावर बोलताना, गुंडांच्या पोशिंदांवरती आणि गुंडांवरती कारवाई केली पाहिजे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. विधानभवन हे पवित्र मंदिर आहे, तिथे अशाप्रकारे मारामारी होत असेल तर हे चुकीचं आहे. लोकप्रतिनिधींना धक्काबुक्की होत असेल, मारहाण होत असेल तर हे चुकीचं आहे. विधानभवन प्रांगणामध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त असताना हे लोक आतमध्ये कसे आले? यांना पास कुणी दिले? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.
हेही वाचा
फडणवीसांकडून काल ऑफर, उद्धव ठाकरेंनी आज अँटी चेंबरमध्ये घेतली भेट; दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा
आणखी वाचा