
Rohit Pawar & Gopichand Padalkar: ज्या विधिमंडळात महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे प्रश्न मांडले जातात आणि जिथे कायदे तयार होतात, तिथे हाणमारी होते. सत्तेत असलेल्या काही आमदारांना वाटतं की, आपली सत्ता आहे, आपण कुठेही कायदा हातात घेऊ शकतो. कुठेही कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतो, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. ते शुक्रवारी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधानभवनातील राड्यावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मकोका आणि इतर गुन्हे असलेल्या चार-पाच लोकांना विदाऊट पास आतमध्ये घेऊन आले. त्यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर थांबवण्यात आले होते. त्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी आली होती. गोपीचंद पडळकरांसोबत असलेला एका कार्यकर्ता गांजा विकतो. भाजप आमदार पडळकर अशा मकोका असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन येतात. आव्हाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा आमचा कार्यकर्ता नितीन देशमुख मध्ये पडला, त्याला मारण्यात आले. नितीन देशमुखचं दीड महिन्यांपूर्वी ऑपरेशन झाले आहे. त्याला मारहाण करण्यात आली, असे रोहित पवारांनी सांगितले.
सध्या हे आका टाईप लोक सरकारमध्ये आहेत. बीडमध्ये एक आका होता. आता सांगलीत नवा आका तयार झाला आहे. त्याला वाटतं विधिमंडळ म्हणजे त्याचं साम्राज्य आहे, तिथे ते कसेही वागू शकतात. हा न्यू आका इन मेकिंग आहे. सरकारने त्याला वेळीच कंट्रोल करावे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर कारवाई करणार, विधानसभा अध्यक्षांची माहिती
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी विधानभवनात झालेल्या राड्याविषयी भाष्य केले. त्यांनी विधिमंडळात आमदारांसोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संख्येवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त केली. मी कार्यकर्त्यांना परवानगी न देण्यापेक्षा सर्व सदस्यांनी मनावर घेतलं तर बरं होईल, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले. मी कालच्या घटनेबद्दल माहिती घेतली आहे. दुपारी दीड वाजता प्रश्नोत्तराच्या तासानंतर मी याबाबत सभागृहाला अवगत करेन, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
आणखी वाचा
गोपीचंद पडळकरांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकटा भिडणारा नितीन हिंदुराव देशमुख कोण?
आणखी वाचा