
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांच्या समर्थकांमध्ये थेट विधानसभा लॉबीत झालेल्या वादाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनेनं महाराष्ट्राच्या विधिमंडळ आणि राजकीय संस्कृतीचे धिंदवडे निघाले आहेत. त्यावरुन, आज विधानपरिषदेतही चर्चा होत असून विधिमंडळात येण्यासाठी चक्क 5-10 हजार रुपयांना पास विकले जात असल्याचा धक्कादायक आरोप आमदार शशिकांत शिंदे (Shashikant shinde) आणि आमदार अनिल परब यांनी केला आहे. सभागृहाच्या प्रांगणात काल मारामारी झाली. दोन आमदारांच्या समर्थकामधे ही मारामारी झाली. मोक्का लावलेले आरोपी विधीमंडळात येतात, या सभागृहाला संसदीय परंपरा आहे, अशा परिसरात मारामाऱ्या होणे ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं.
जितेंद्र आव्हाड किंवा गोपीचंद पडळकर या दोघांच्या कार्यकर्त्यांमधे मारामारी झाली. एक आमदार सांगतो संबंधित व्यक्तीला मारा म्हणून, एका व्यक्तीला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय दिला जातो. एकाला पोलीस तंबाखू मळून देतात हे अतिशय गंभीर आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न विधिमंडळात निर्माण झाला आहे, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं. तर, आमदार शशिकांत शिंदे आणि अनिल परब यांनीही विधिमंडळात येण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासबाबत धक्कादायक माहिती सभागृहात दिली.
पासचा रेट 5 ते 10 हजार
सदनात धोका निर्माण होण्यासारखी परिस्थितीत निर्माण झाली आहे, मग आता चर्चा कसल्या करतात. मागील अनेक दिवसांपासून पाहत आहे की, या सदनाची बाहेर काय प्रतिमा जात असेल? अतिशय वेदनादायी चित्र पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आता विधिमंडळ सभागृहात येणे एवढच आता बाकी राहिलं आहे. फार मोठी गर्दी सतत पाहिला मिळत आहे. एक महिला सदस्य सना मलिक स्वत: म्हणाल्या एवढ्या गर्दीतून वाट काढणे अवघड होऊन जात आहे. सध्या याठिकाणी पासचा रेट 5 हजार रुपये, 10 हजार रुपये सुरू असल्याचा गंभीर आरोपच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी केला आहे.
मंत्र्यांना पास मिळाला नाही, पण कार्यकर्ता आत
सभापतींनी निर्देश दिले की, पास बंद करा मग तरीदेखील ही गर्दी झालीच कशी? एक मंत्री आहेत ते पास मागण्यासाठी गेले. त्यांना सांगण्यात आलं पास बंद करण्यात आले आहेत. मात्र, ते ज्या कार्यकर्त्यांसाठी पास घेण्यासाठी गेले होते तो कार्यकर्ता तासाभरात सभागृहात आला. मंत्र्यांनी त्याला विचारलं तू कसा आत आला? तो म्हणाला कसं आलो ते सांगू नका मात्र मी आत आलो आहे, असा किस्साही शशिकांत शिंदे यांनी सांगितला.
काल ज्याने मार खाल्ला त्याला अटक केली आणि ज्यांनी मारहाण केली त्या सगळ्यांवर कारवाई का केली नाही? जितेंद्र आव्हाड यांना धमकी येते की तुम्हाला मारून टाकू. काल पोलीस तंबाखू मळून आरोपीला देत होता, काय पोलिसांची प्रतिमा राहिली तुम्ही सांगा?. आता तुम्ही खुलासा करणार आणि दोघांना देखील दोषी धरणार. आता, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला, आता आंदोलन सुद्धा करायचं नाही का? असा सवालही शिंदेंनी सभागृहात उपस्थित केला.
आयनॉक्स थिअेटरजवळ विकले जातात पास – परब
मुंबईतील आयनॉक्स थेअटर जवळ 5 हजार आणि 10 हजार रुपये देऊन पास विकले जात आहेत. कुणाला पैसे द्यायचे, कुठे द्यायचे, विधानभवनच्या पहिल्या गेटवर किती द्यायचे, आतल्या गेटवर किती पैसे द्यायचे हे ठरलेले आहे. आम्ही दुपारपर्यंत तुम्हाला एफिडेव्हीटवर नावे लिहून देतो, अशी धक्कादायक माहिती शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला.
कठोर निर्णय घेणे अपेक्षित – पाटील
काल जी घटना घडली, ती अतिशय वाईट आहे. नेमकं काय घडलं आहे, याबाबत विधानसभा अध्यक्ष अहवाल मांडणार होते. मात्र, जयंत पाटील यांनी विनंती केली होती की थोड्या वेळाने अहवाल सादर करावा, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. तर, विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनीही कठोर निर्णय घेण्याचे सांगितले आहे. दोन्ही सभागृहासाठी घडलेली घटना गंभीर आहे, यावर काहीतरी कठोर निर्णय घेणे अपेक्षित आहे. 289 अन्वये चर्चा उपस्थित झाली, त्यावर आजच आम्ही निर्णय जाहीर करतो, अशी माहितीही राम शिंदे यांनी दिली.
हेही वाचा
मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल
आणखी वाचा