
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी बातमी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे तब्बल साडेचार तास एकाच हॉटेलमध्ये होते. वांद्रेमधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून उपस्थित होते. त्यामध्ये अर्धा ते एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सोफिटेल हॉटेलला गेले होते. सुरुवातीला आदित्य ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचले आणि नंतर एक तासाभराच्या अंतराने देवेंद्र फडणवीस पोहोचले. हे दोन्ही नेते साडेचार तासाहून अधिक वेळ या हॉटेलमध्ये होते. तर अर्धा ते एक तास चर्चाही झाल्याची माहिती आहे.
दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक
सोफिटेल हॉटेलमधील कॅफेटेरिया एरियामध्ये या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. यावेळी हा एरिया बंद करण्यात आला होता. या एरियामध्ये कुणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे या दोन्ही नेत्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली यानंतर आता आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची एकाच हॉटेलमध्ये एकाच वेळी आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकाच हॉटेलमध्ये आल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे हे सोफिटेल हॉटेलमध्ये साडेपाच ते सहाच्या दरम्यान एका संगीत कार्यक्रमाला आले असल्याची माहिती आहे. तर त्याच सोफिटेल हॉटेलमध्ये एका खाजगी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सातच्या दरम्यान आले असल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीसांठी उद्धव ठाकरेंना ऑफर
देवेंद्र फडणवीसांनी चक्क उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आणि ती देखील भर विधान परिषदेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवे यांचे शेटवचे अधिवेशन होतं. त्यांना निरोप देताना केलेल्या भाषणात फडणवीसांनी चक्क उद्धव ठाकरेंना ऑफर दिली. 2029 पर्यंत आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा काही स्कोप नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी इथे येण्याचा विचार करावा अशी ऑफरच फडणवीसांनी दिली. विशेष म्हणजे फडणवीसांकडून ही ऑफर दिली जात असताना एकनाथ शिंदेही सभागृहात उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य जरी मिश्किलपणे केलं असलं तरी त्याची राजकीय वर्तुळात गंभीर चर्चा सुरू आहे.
दरम्यान दानवेंच्या निरोप समारंभापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ओझरती भेट झाली होती. तर ही ऑफर दिल्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्याचवेळी आता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन भूकंप होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आणखी वाचा