
NCP Suraj Chavan beaten Chhava Sanghatana Workers: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी रविवारी लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत छावा संघटनेचे (Chhava Sanghatana) अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत माफी मागितली. त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांवर अशा बातम्या चालू आहेत की,शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटील यांना आम्ही मारहाण केली. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. कोणी शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आवाज उठवला, तर त्याच्या पाठीशी उभे राहणे मी माझं कर्तव्य समजतो. परंतु, असंवैधानिक शब्द वापरला, आमच्या नेतृत्त्वाबद्दल म्हणून आमच्याकडून तशीही कृती झाली. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरेंच्या दौऱ्यातून युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना वगळल्याची माहिती समोर आली आहे. कालच्या घटनेनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाणीचे धाराशिवमध्येही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सूरज चव्हाण यांना तटकरेंच्या पुढील दौऱ्यातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Latur News: छावा संघटनेकडून लातूर बंदची हाक
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात चक्क ऑनलाईन जुगार खेळत आहेत, असा एक व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राज्यभरात याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत या मुद्द्यावरुन जाब विचारला होता. यावेळी छावाच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे बसलेल्या टेबलवर पत्ते उडवले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती.
अखिल भारतीय छावा संघटनाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी घाडगेंना मारहाण केली होती. सुरज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत आणि शासन होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला आहे. आज लातूर बंद आणि परवा लातूर जिल्हा बंदच आयोजन करण्यात आला आहे. यात सर्व पक्षांनी सहभाग घेतला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा