
नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांचा रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एकीकडे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना झालेल्या मारहाणीवरुन वातावरण तापलं आहे. त्यातच, अजित पवारांनी सूरज चव्हाण यांच्याकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं आहे. मात्र, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचं छावाचे विजय घाटगे यांनी म्हटलं. आता, याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांना विचारले असता, त्यांनी अधिक बोलणे टाळले. तसेच, सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्यावर आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत विचारणा केली असता छगन भुजबळ म्हणाले, मला त्याची माहिती नाही, अजित दादांनी काय आदेश दिले मला माहिती नाही. ज्यांना निवेदन द्यायचे त्यांनी द्यावे. पण, पत्ते उधळणे योग्य नाही, पत्ते खेळणे हा प्रकार काय तटकरे यांनी केला नव्हता, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना टोला लगावला. तसेच, तटकरे यांचा यात काय दोष, तटकरे काय पत्ते खेळत नव्हते, असेही भुजबळ यांनी म्हटले. दरम्यान, माणिकराव कोकाटेच्या राजीनाम्याबाबत विचारणार केली असता, मला त्याची माहिती नाही, असे उत्तर भुजबळ यांनी दिले.
सरकार सुप्रीम कोर्टात जाऊ शकते
मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटप्रकरणी भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 18 वर्षे झाले असतील तर हा प्रश्न असू शकतो. कदाचित त्यांची शिक्षा संपली असेल. सरकार सुप्रीम कोर्टात जाऊ शकते, मला त्याची पूर्ण माहिती नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
हनी ट्रॅपप्रकरणी काय म्हणाले भुजबळ
हनी ट्रॅपप्रकरणी ते मला माहित नाही, त्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहे. त्यात आम्ही बोलणे बरोबर नाही, आम्ही त्यावर काही कॉमेंट करणं बरोबर नाही. पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम करेल, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
द्वारका सर्कलबाबत काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांनी द्वारका सर्कल संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भूमिका मांडली. प्रश्न सुटत नाही, त्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. नको तिथे गाड्या थांबणं योग्य नाही. सिग्नल सोडून ट्रक उभे राहत आहे, पोलिसांना थोडं प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यानंतर या अडचणी दूर होतील, PWD काही अभ्यास करत आहेत. अडचणी कुठे येता याचा अभ्यास सुरू आहे आणि त्यानंतर त्यावर उपाय केले जाईल. दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ लागेल पण कमी नाही अशी अपेक्षाही भुजबळ यांनी व्यक्त केली.
हेही वाचा
आणखी वाचा