
Jain Mandir Vile Parle: विलेपार्ले पूर्वमधील कांबळीवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम पाडल्यामुळे तडकाफडकी झालेले सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे (Navnath Ghadge) यांना अखेर नियमित बढती मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी जैन मंदिरावरील (Jain Temple) कारवाईनंतर वाद पेटला होता. जैन समाजाने मुंबईत मोठा मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर या कारवाईसाठी पुढाकार घेणारे मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांची बढतीही रोखून धरण्यात आली होती. राजकीय दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होती. यावरुन सरकारवर जोरदार टीकाही झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने विलेपार्ले (VileParle) येथील जैन मंदिराचे अनधिकृत बांधकाम काढण्याच्या कारवाईला योग्य ठरवल्यानंतर प्रशासनाने नवनाथ घाडगे यांना बढती दिली आहे.
मुंबई महापालिकेने एमआरटीपी कायद्यानुसार जैन मंदिरातील अनधिकृत बांधकामावर पाडकाम केले होते. 9 जुलै रोजी उच्च न्यायालयाने या कारवाईला कायदेशीर ठरवत, सहाय्यक आयुक्तांची भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने पालिकेची बाजू उचलून धरल्यानंतर म्युन्सिपल इंजिनिअर्स असोसिएशन आक्रमक झाली होती. या निर्णयानंतर बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे नवनाथ घाडगे यांची बदली रद्द करण्याची आणि थांबवलेली बढती देण्याची मागणी केली होती. अखेर महापालिका प्रशासनाने त्या अधिकाऱ्याला न्याय दिला असून त्यांना नियमाने देय असलेली बढती देण्यात आली आहे. घाडगे यांना 21 जुलै रोजी उपप्रमुख अभियंता पदावर बढती देण्यात आली असून त्यांना पाणीपुरवठा प्रकल्प विभागात नियुक्त करण्यात आले आहे.
Mangalprabhat Lodha News: जैन समाजाला चिथावणी देणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांच्या हकालपट्टीची मागणी
मुंबई उच्च न्यायालयाने विलेपार्ले येथील जैन मंदिराचे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई योग्य ठरवली होती. हे अनधिकृत जैन मंदिर तोडल्यानंतर मुंबईतील जैन समाज प्रचंड आक्रमक झाला होता. त्यावेळी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या भावना भडकावण्याचे काम केले. गोपनीयतेची शपथ घेतलेला राज्यमंत्री कसं काय एका समाजाला भडकावतो? मोर्चाचं नेतृत्व कसं करू शकतो? त्यामुळे मंगलप्रभात लोढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी म्युन्सिपल इंजिनिअर्स युनियनने केली होती.
आणखी वाचा
विलेपार्लेतील जैन मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी, महापालिका आयुक्तांचे आदेश
आणखी वाचा