
Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate: अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याकडून कृषी खाते काढून घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याचा कारभार काढून ते वाईचे आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांच्याकडे दिला जाण्याची दाट शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईन रमी (Rummy) खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना नाराजी व्यक्त केली होती. तर अजित पवार या सगळ्यावर मौन बाळगून होते. विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकही नेता माणिकराव कोकाटे यांच्या बचावासाठी मैदानात उतरला नव्हता. तेव्हाच माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होण्याचे संकेत मिळाले होते.
माणिकराव कोकाटे हे काल स्वत:हून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. परंतु, कोकाटे यांनी कालही नेहमीप्रमाणे ‘मीच बरोबर कसा?‘ हा धोशा लावला होता. हे सगळे पाहता ते स्वत:हून राजीनामा देण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे आता अजित पवार यांनाच स्वत:हून कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे. यापूर्वी सूरज चव्हाण यांच्याबाबतही असाच प्रकार घडला होता. लातूरमध्ये सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलीन झाली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांनी माफी मागून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात होती. सूरज चव्हाण यांनी राजीनामा न दिल्याने शेवटी अखेर अजित पवार यांनी स्वत:च ट्विट करुन चव्हाण यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. त्याचप्रकारे आता माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. तत्पूर्वी आदल्या दिवशी माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची फोनवरुन बातचीत झाल्याची चर्चा होती. त्यामुळे काल माणिकराव कोकाटे हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. परंतु, माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा किंवा दिलगिरी तर सोडाच पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली होती. आपल्याकडून काहीच चुकीचे कसे घडले नाही, नेहमीप्रमाणे आपणच कसे बरोबर आहोत, हे सांगण्यातच माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद खर्ची घातली होती. हे करताना माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक घोळ घालून ठेवला. त्यांनी या पत्रकार परिषदेत ‘शासन भिकारी‘ असल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना आता पाठिशी घालायचे नाही, असे ठरवल्याचे सांगितले जात होते. माणिकराव कोकाटे हे आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेण्यासाठी येणार होते. दुपारी तीन वाजता या दोन्ही नेत्यांची बैठक ठरली होती. मात्र, हा दौरा अचानक रद्द झाला होता. अजितदादांनी कोकाटेंना भेट नाकारल्याने आता त्यांची गच्छंती अटळ असल्याचे सांगितले जात आहे.
आणखी वाचा
सरकारला ‘भिकारी’म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान; म्हणाले…
आणखी वाचा