
Fishing : मासेमारी (Fishing) बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवा अशी मागणी महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातच्या (Gujarat) मच्छिमारांनी केली आहे. याबाबत मच्छिमारांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं आश्वासन नितेश राणे यांनी मच्छीमारांना दिलं आहे. शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्याने लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात समुद्र खवळलेला असतो
इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशन मधील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्रातील पावसाळी मासेमारी बंदी कालावधी गुजरात राज्याच्या धर्तीवर 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी शिष्टमंडळाने मंत्री राणेंकडे केली आहे. गुजरात राज्याने पावसाळी मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट केल्याने शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्याने मासळी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी, पावसाळी मासेमारी बंदी 15 ऑगस्ट पर्यंत करण्याचा जोर सर्व पारंपारिक मच्छीमारांनी धरला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात वादळी वारे मोठ्या प्रमाणात होत असतात ज्यामुळे समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मच्छिमारांची जीवितहानी तसेच नौकांचे नुकसान होण्याची शक्यता बळावते. म्हणूनच पावसाळी मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी उपस्थित मच्छिमारांकडून करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे प्रस्ताव सादर करणार
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी सदर मागणी योग्य असल्याचे उपस्थित मच्छिमारांना सांगितले. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे आश्वासन मच्छिमार शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी दि.1 जून ते 31 जुलै 2025 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रायगड-अलिबाग संजय पाटील यांनी केले. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छिमार खालील कारवाईस पात्र होतील. सदर पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही.
महत्वाच्या बातम्या:
पुण्यात मोठे मत्स्यालय ते AI तंत्रज्ञानाचा वापर, मत्स्य व्यवसायासंदर्भात मोठे निर्णय होणार, मंत्री राणेंची माहिती
आणखी वाचा