
सोलापूर : याच महिन्यातील पहिल्या आठवड्यात आषाढी वारीनिमित्ताने अवघी पंढरी (Pandharpur) दुमदुमली होती. लाखो वारकऱ्यांच्या आगमनाने पंढरपूर फुलून गेले होते, हजारोंच्या संख्येने दर्शनरांगेत भाविकांची गर्दी पाहायला मिळत होती. तर, यंदा प्रशासनाने दर्शनरागेंसाठी उत्कृष्ट नियोजन केल्याने भाविकांना अधिकचे ताटकळत बसावे न लागल्याने विठुरायाचे दर्शनही लवकर होत होते. मात्र, आषाढी (Ashadhi) यात्रा काळात दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराकडून पैसे घेतल्याच्या आरोप असलेल्या मंदिर समितीचा व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आली आहे. मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवार पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात विठू माऊलीचे आणि रखुमाईचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. त्यानंतर, काही तासातच ही कारवाई मंदिर समितीने केली आहे.
आषाढी यात्रा काळात दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराकडून पैसे घेतल्याच्या आरोप असणाऱ्या मंदिर समितीचा व्यवस्थापक मनोज श्रोत्री याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय आज मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर काही तासांतच मंदिर समितीने श्रोत्री यांच्यावर कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
आषाढी यात्रा काळात दर्शन रांग उभारणीसाठी एका ठेकेदाराकडून महसूल विभागातील नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकारी असलेल्या मनोज श्रोत्री यांनी पैशाचा व्यवहार केल्याबाबत आरोप झाले होते. या संदर्भात अनेक फोनच्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाल्या होत्या. याची गंभीर दखल मंदिर समितीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आली असून श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
8 दिवसांत समितीचा अहवाल येणार
दरम्यान, आषाढी वारीदरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन रांगेत पत्रा शेड, त्याचबरोबर बॅरिगेटिंग या कामासाठी ठेकेदाराकडून पैसे घेतल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर, याप्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात आली असून ही समिती 8 दिवसात चौकशी करून अहवाल मंदिर समितीला देणार आहे. याचबरोबर मंदिर समितीच्या गोशाळेत एका वासराचा मृत्यू झाल्या प्रकरणी देखील समितीने सर्व जबाबदार कर्मचाऱ्यांकडून खुलासे मागवले असून यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.
विठ्ठल मंदिरात व्हर्च्युअल रिॲलिटी गॉगल सुविधा
राज्यात पहिल्यांदा व्हर्च्युअल रिॲलिटी गॉगल माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहण्याचा अनुभवण्याचा उपक्रम शुभारंभ आज मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. व्हर्च्युअल वर्ल्ड कंपनी माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा मंदिर,गाभारा याचे 3D चित्रीकरण केले आहे. तसेच देवाची विविध रूपे दिसणार आहेत. व्हर्च्युअल रिॲलिटी गॉगल घातल्यानंतर भाविकांना साक्षात देवासमोर उभे असल्याचा अनुभव भाविकांना येतो. देशात उज्जैन , काशी विश्वेश्वर यानंतर महाराष्ट्रात प्रथमच पंढरपूर मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत झाला.
हेही वाचा
आणखी वाचा