
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना भाजप नेते राज पुरोहितांनी त्यांची तुलना भगवान विष्णू सोबत केली. नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवताप आहेत, ते कधीही न थांबणारे आणि कधीही न थकणारे पंतप्रधान आहेत असं राज पुरोहित म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या तीन महिन्यांपासून मोदींना फोन करत आहेत, पण मोदी त्यांचा फोन उचलत नाहीत असंही ते म्हणाले. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर दादरमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी राज पुरोहित यांनी हे वक्तव्य केलं.
या आधी भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना भगवान विष्णूसोबत केली होती. त्यानंतर आता भाजपचे नेते राज पुरोहितांनीही तशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे.
Raj Purohit On Narendra Modi : नेमकं काय म्हणाले राज पुरोहित?
मोदींचे कौतुक करताना राज पुरोहित म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही न थकणारे, न थांबणारे पंतप्रधान आहेत. यामुळे माझा आत्मा म्हणतो की ते विष्णूचे अकरावे अवतार आहेत. आपण अमेरिकेला जाऊन आलो की दोन दिवस जेट लॉक लागतो. त्यानंतर आपल्याला विश्रांती घ्यावी लागते. पण मोदी फिनलंड, इंग्लंड दौरा करून अहमदाबादमध्ये दोन दिवसांत 22 उद्घाटन करतात.“
एवढंच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींना गेल्या तीन महिन्यांपासून रोज फोनवर फोन करत आहेत. पण मोदी ट्रम्प यांचा फोन उचलत नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांची अवस्था वेड्यासारखी झाली. जो मोदींना नडेल तो मातीत मिसळेल असं वक्तव्यही राज पुरोहित यांनी केलं.
नरेंद्र मोदी हे मनातील पंतप्रधान
राज पुरोहित म्हणाले की, “आपण ज्यावेळी राष्ट्राचा विचार करतो त्यावेळी पंतप्रधान कसा असावा याची प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते. आपल्या भारतीयांच्या मनातील पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे.“
इंग्लंडने आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केलं आज ते आपल्यासोबत मुक्त व्यापार करार करतात हे मोदींमुळे शक्य झालं असं राज पुरोहित म्हणाले.
राज पुरोहित यांनी नवनियुक्त खासदार उज्ज्वल निकम यांचेही कौतुक केलं. आपल्या सगळ्यांच्या मनात एकाच व्यक्तीसारखे व्हायचे इच्छा असते आणि ती व्यक्ती म्हणजे उज्ज्वल निकम होय. त्यांनी दिवस रात्र देशासाठी काम केलं असं राज पुरोहित म्हणाले.
आणखी वाचा