
मुंबई : गणेशोत्सव जसजसा जवळ येतो आहे, तसतशी सार्वजनिक मंडळांची तयारीही जोरात सुरू झाली आहे. मात्र, यंदा मंडप उभारणीच्या कामात एक मोठा अडथळा समोर आला आहे, तो म्हणजे मुंबई महापालिकेचा नवा ‘दंड नियम’. गणेश मंडळांनी रस्त्यावर जर खड्डा खणला तर एका खड्ड्यामागे 15 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या निर्णयाला मंडळांनी विरोध केला असून महापालिकेने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली जात आहे.
महानगरपालिकेने परिपत्रक काढून स्पष्ट केलं आहे की, रस्त्यावर किंवा पदपथावर मंडपासाठी खड्डा खणला, तर त्या प्रत्येक खड्ड्याबाबत तब्बल 15 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पूर्वी हा दंड फक्त 2 हजार रुपये होता. म्हणजेच यंदा हा दंड तब्बल साडेसात पट वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही कारवाई ‘अन्यायकारक’ असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
मंडळांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता
मंडळांचं म्हणणं आहे की, सार्वजनिक गणपती ही अनेक वर्षांची परंपरा आहे. मंडप उभारणीसाठी काही ठिकाणी रचनेच्या दृष्टीने खड्डे खोदणे गरजेचं असतं. अशावेळी इतक्या मोठ्या दंडामुळे त्यांच्यावर आर्थिक ओझं येणार आहे. याच मुद्द्यावर काही मंडळांनी महापालिकेशी चर्चा करण्याचा आणि निर्णय मागे घेण्याची मागणीही केली आहे.
खड्डा विरहित मंडप उभारणीवर भर द्यावा
रस्ते व पदपथावर खड्डा विरहित मंडप उभारणीकरिता प्रभावी तंत्र उपलब्ध आहे. या तंत्राचा उपयोग करून श्रीगणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारावेत, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे. मंडप उभारताना खड्डा खणल्याचे आढळल्यास संबंधित मंडळांकडून रस्त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च व दंड याकरिता प्रति खड्डा प्रमाणे रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन एक खिडकी प्रणाली सुरू
सगळ्यांचा आवडता ‘श्रीगणेशोत्सव’ महाराष्ट्र शासनाने यावर्षापासून “महाराष्ट्राचा राज्य उत्सव” म्हणून घोषित केला आहे. मुंबईतील श्रीगणेशोत्सव उत्साहाने व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा