
Somnath Suryawanshi case: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात (Somnath Suryawanshi death case) गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी उच्च न्यायालयाने हाच आदेश दिला होता. मात्र, महायुती सरकारने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. हा महायुती सरकार आणि परभणीतील पोलीस यंत्रणेला मोठा धक्का मानला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यापूर्वी सरकारने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, सोमनाथच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार आहेत, असे सांगत सोमनाथ यांच्या आईने ही मदत नाकारली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सोमनाथ यांच्या आईला रडू कोसळले. यावेळी प्रतिक्रिया देताना विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटले की, मी परभणी वकील संघ, औरंगाबाद वकील संघ, मुंबई उच्च न्यायालय वकील संघ आणि प्रकाश आंबेडकर या सर्वांची आभारी आहे. प्रकाश आंबेडकर एखाद्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी खंबीरपणे उभे राहून मला न्याय मिळवून दिला. या देशाच्या संविधानासाठी सोमनाथचं रक्त सांडलं आहे, त्याने बलिदान दिलं आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांचं बलिदान वाया जाऊन दिले नाही, यासाठी मी त्यांची आभारी आहे, असे विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटले.
Parbhani Somnath Suryawanshi case: माझ्या लेकराला हाडं तुटेपर्यंत बेदम मारलं, पोलिसांनी त्याचा खून केला; सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा आरोप
पोलिसांनी घरात शिरुन दारं तोडून मारहाण केली. सोमनाथचं इन कॅमेरा शवविच्छेदन झाले होते, ते खरं झालं होतं. त्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. कोणाच्या लेकरावर ही वेळ येऊ नये. माझा मुलगा वकील होणार होता. माझ्या लेकराला डांबून नेऊन पोलिसांनी मारलं मात्र, राज्य सरकारने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाला चार दिवस मारहाण करुन पोलीस कोठडीत ठेवलं. माझ्या लेकराला हाडं तुटेपर्यंत बेदम मारलं, पोलिसांनी माज्या लेकराचा खून केला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले, असे विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा