
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांच्या राजीनाम्याची चर्चा आता संपुष्टात आली आहे. कारण, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी आणखी एक संधी दिल्याचे समजते. त्यामुळेच, अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित पार्टीला कोकाटेंची देखील उपस्थिती होती. मात्र, कोकाटेंचा राजीनामा न झाल्याने विरोधक आक्रमक झाले असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali damania) यांनी देखील रोष व्यक्त केला आहे. तसेच, आता एक अशी माहिती मिळाली आहे की, मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात 18 ते 22 मिनिटं ते पत्ते खेळत होते, असेही दमानिया यांनी म्हटलं आहे. तसेच, कोकाटे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ते रम्मी नावाची पत्त्यांची गेम खेळताना कृषिमंत्री दिसून येतात. आमदार रोहित पवारांनी आपल्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर विरोधकांकडून कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र, आपण रम्मी गेम खेळत नव्हतो, तर पॉपअप झाल्याने ती जाहिरात अचानक समोर आल्याचं स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिलं होतं. त्यानंतर, अजित पवारांनीही इजा.. बिजा.. तिजा.. म्हणत माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, कोकाटे यांनी भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना शेवटची संधी दिल्याचे समजते. तसेच, त्यांचा राजीनामा देखील घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यावरुन, आता अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, माणिकराव कोकाटे हे 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते, असेही त्यांनी म्हटलं आहे.
विधिमंडळाचा अहवाल आला आहे
मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात 18 ते 22 मिनिटं ते पत्ते खेळत होते. एक आमदाराने असं सांगितलं आहे की, विधिमंडळाचा अहवाल आहे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. पण जर 18 ते 22 मिनिटं खरोखर ते अधिवेशनात पत्ते खेळत असतील अशा व्यक्तीला अजित पवार यांनी तात्काळ फेरविचार करून राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. पत्ते खेळायची जागा अधिवेशन नक्कीच नाही, जर पत्ते खेळायचे असेल तर त्यांनी त्यांच्या घरी जाऊन खेळावे. अधिवेशन हे लोकांचे मुद्दे मांडण्याची जागा आहे, जर एखादे मंत्री पत्ते खेळत असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा