
मुंबई : मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा वर्दीतील प्रवास आता थांबला आहे. दया नायक हे गुरुवारी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. 1995 साली दया नायक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर आता सुमारे 31 वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास थांबला.
दया नायक यांच्या या प्रवासात अनेकदा संघर्षमय, वादग्रस्त वळणं आली. तसेच त्यांच्या वाट्याला जेवढी प्रसिद्धी आली तेवढीच बदनामीही आली. असं असतानाही मुंबई पोलीस दलात मात्र त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचा धाक आजही गुन्हेगारांमध्ये आहे.
Daya Nayak Retired : अंडरवर्ल्ड टोळ्या संपवल्या, 86 एन्काउंटर नावावर
नव्वदच्या दशकात मुंबईतील गँगस्टर टोळी संपवण्यात दया नायक यांची भूमिका महत्वाची होती. दया नायक यांच्या नावावर 86 एन्काउंटर आहेत. यामध्ये दाऊद टोळीतील 22 गुंडांचा, राजन टोळीतील 20 गुंडांचा समावेश आहे. याशिवाय लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE), लष्कर ए तैय्यबा यासारख्या प्रतिबंधक संघटनांशी संबंधित व्यक्तींनाही नायक यांनी चकमकीत ठार मारले.
अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचा तपास दया नायक यानी केला होता. कंदहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवाद्यांशी संबधित तीन दहशतवाद्यांचा नायक यांनी एन्काउंटर केला होता. आपल्या कारकीर्दीत एक हजारांहून अधिक आरोपींना अटक करणारे दया नायक रेल्वे स्फोटांच्या तपासातही सहभागी होते.
दहा महिन्यांपूर्वी ते एसीपी पदासाठी पात्र ठरले होते. पण निवृत्तीच्या दोन दिवस आधी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.
Who Is Daya Nayak : कोण आहेत दया नायक?
1990 च्या दशकात मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख निर्माण करणारे दया नायक हे आजही अंडरवर्ल्ड विरोधातील संघर्षाचे प्रतीक मानले जातात. त्यांनी मुंबईत 86 कुख्यात गुंडांचा एन्काउंटर केला आहे.
कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेले दया नायक कोकणी भाषिक कुटुंबातून आले. कन्नड माध्यमाच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, 1979 मध्ये ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले. येथे त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करत असतानाच गोरेगावमधील महापालिकेच्या शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अंधेरीतील सीईएस कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
प्लंबर अप्रेंटिस म्हणून काम करत असताना, त्यांचा संपर्क अमली पदार्थविरोधी विभागातील काही पोलीस अधिकाऱ्यांशी आला. त्यातूनच पोलीस सेवेत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली. अखेर, 1995 मध्ये पोलीस अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची जुहू पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.
यादरम्यान, मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रभाव प्रचंड होता. डिसेंबर 1996 मध्ये त्यांनी जुहूमधील एन्काउंटरमध्ये छोटा राजनच्या दोन गुंडांचा खात्मा केला आणि यानंतर त्यांची ओळख एक एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून झाली.
प्रसिद्धीबरोबरच वादही दया नायक यांच्या वाट्याला आले. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या आरोपांमुळे 2004 मध्ये त्यांची चौकशी सुरू झाली. मोक्का न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) दया नायक यांची बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एसीबीने त्यांच्याशी संबंधित सहा ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मुंबईतील अंधेरीत व करकला (कर्नाटक) येथे त्यांच्या मालकीच्या दोन लक्झरी बसेसचा तपशील समोर आला. या प्रकरणात त्यांना अटकही झाली.
या वादळातून सावरत 2012 मध्ये त्यांची अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली. मात्र, 2014 मध्ये त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले. त्यानंतर 2016 मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. आजवर त्यांच्या नावे 86 एन्काऊंटरची अधिकृत नोंद आहे. दया नायक यांना मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.
आणखी वाचा