
Mumbai Kabutar Khana News: गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई सुरु केली आहे. पालिकेकडून शहरातील कबुतरखाने बंद केले जात आहेत. यावरुन मुंबईत राजकारण पेटले असताना मीरा-भाईंदरमध्ये (Mira Bhyandar) धक्कादायक प्रकार घडला आहे. मीरारोडमध्ये एका 69 वर्षांच्या व्यक्तीने कबुतराला दाणे टाकण्यास अटकाव केल्याने त्याला आणि त्याच्या मुलीला मारहाण करण्यात आली. रविवारी मीरारोडच्या ठाकूर मॉलजवळ असणाऱ्या डीबी ओझोन इमारतीमध्ये हा प्रकार घडला. (Crime News)
महेंद्र पटेल (वय 69) हे डीबी ओझोन इमारतीमध्ये वास्तव्याला आहेत. ते रविवारी सकाळी दूध आणण्यासाठी बाहेर गेले होते. ते पुन्हा इमारतीजवळ आले तेव्हा बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या आशा व्यास (वय 56) या कबुतरांना दाणे टाकत होत्या. महेंद्र पटेल यांनी आशा व्यास यांना कबुतरांना दाणे टाकू नका, असे सांगितले. त्यावरुन आशा व्यास यांनी पटेल यांना शिवीगाळ सुरु केली. हा गोंधळ ऐकून महेंद्र पटेल यांची मुलगी प्रेमल पटेल (वय 46) या इमारतीखाली आल्या. तिने आशा व्यास यांना जाब विचारला. यानंतर व्यास यांच्या इमारतीमध्ये राहणारा सोमेश अग्निहोत्री दोन लोकांना घेऊन तिकडे आला. त्याने लोखंडी रॉडने प्रेमल पटेल यांना मारहाण केली. तर दुसऱ्या व्यक्तीने प्रेमल पटेल यांचा गळा दाबला. या घटनेप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी सोमेश अग्निहोत्री, आशा व्यास आणि आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई महानगरपालिकेने ताडपत्री टाकून दादर कबुतरखाना बंद केल्यामुळे आता कबुतरांना त्याठिकाणी बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे ही कबुतरं रस्त्यावर आणि आजुबाजूच्या दुकानांवर, इमारतीवर बसत आहेत. मात्र, रस्त्यावरील गाड्यांच्या रहदारीमुळे काही कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. पूर्वी कबुतरांना आतमध्ये खायला मिळत होते. त्यामुळे कबुतरं रस्त्यावर येत नव्हती. आता कबुतरखाना झाकल्याने पक्ष्यांना बसण्यासाठी जागा शिल्लक नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
Mangalprabhat Lodha: मंगलप्रभात लोढांनी दादर कबुतरखान्यासाठी शड्डू ठोकला
मुंबईतील कबुतरखान्यांवर पालिकेने कारवाई सुरु केल्यामुळे जैन समाज आक्रमक झाला आहे. राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील कबुतरखान्यांना पर्यायी जागा दिल्याशिवाय ते बंद करु नयेत, अशी मागणी करताना दिसत आहेत. कबुतरं नॉनव्हेज खात नाहीत, ते पडलेलं खात नाहीत, हे कबुतराचं वैशिष्ट्य आहे. आम्ही त्यांना मरु देणार नाही, ही आमची जबाबदारी आहे. लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. यामध्ये काहीही दुमत नाही. जिथे लोकवस्ती कमी आहे, रेसकोर्स आहे, बीकेसी आहे, कोस्टल रोडवरील गार्डन्स आहेत, तिथे या कबुतरांची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
दादरचा कबुतरखाना BMC ने ताडपत्री टाकून बंद केला, धान्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा
आणखी वाचा