
मुंबई : मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा असा आदेश उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी एमएमआर रिजनमधील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. येत्या ऑक्टोबरच्या अखेरील महापालिका निवडणुकीचे आदेश जारी होण्याची शक्यता असून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख त्यासोबतच महत्त्वाचे पदाधिकारी यांच्यासोबत ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर , भिवंडी, वसई विरार या 7 महापालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. जिथे जिथे गटप्रमुखांच्या नेमणुका झालेल्या नाहीत तिथे गटप्रमुखांच्या नेमणुका करा, महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक तयारी करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या.
कोर्टाच्या निर्णयानुसार नवीन प्रभाग रचनेनुसार ज्या निवडणुका होणार आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवा, ज्या गोष्टी घडत आहेत त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महापालिकेत बहुमत मिळवू
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने पालिका निवडणुकीत बहुमत प्राप्त करू असं खासदार राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिकमध्ये बहुमत प्राप्त करू असं संजय राऊत यांनी म्हटलंय. एकाअर्थी राऊत यांनी दोन्ही भाऊ एकत्र येत असल्याचंच सुतोवाच केलं.
युतीबाबत अद्याप घोषणा नाही
हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र मेळावा झाला, वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले. पण ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी वारंवार युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली. पण राज ठाकरे मात्र पत्ता उघड करायला तयार नव्हते. मात्र राज ठाकरेंनी मनसेच्या मेळाव्यात केलेल्या एका व्यक्तव्यामुळे युतीचा चर्चेला पुन्हा वेग आला.
मनसे कार्यकर्त्यांसमोर बोलताना राज ठाकरेंनी चक्क उद्धव ठाकरेंचा संदर्भ दिला. 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता? असा सवाल राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना केला. पण त्यांचा राजकीय संदेश मात्र महाराष्ट्रभर पोहोचला. असं असलं तरी राज ठाकरेंनी युतीबाबत मात्र कोणतीही घोषण करणं टाळलं. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय, हे अजून गुलदस्त्यातच आहे.
ही बातमी वाचा;
आणखी वाचा