
Mumbai crime : भाईंदर पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात व्यावसायिक वादातून तीन मराठी युवकांवर 5-6 परप्रांतीय तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी ( 5 ऑगस्ट ) घडली आहे. पाच ते सहा परप्रांतीय आरोपींनी भूषण पाटील, रुपेश पाटील आणि नितेश पाटील यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. या तिघांना तातडीने भाईंदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते सध्या उपचार घेत आहेत.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय गुंडांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पोलिसांची भीतीच उरलेली नाही, परप्रांतीय गुंड खुलेआम दादागिरी करत आहेत. अशा गुंडांना तात्काळ अटक झाली नाही, तर आम्ही पुन्हा मोर्चा काढू,” असा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे. याआधी काही दिवसांपूर्वीही मराठी साठी मोर्चा काढण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर रेल्वे स्थानकावरील एका कामाचा ठेका फिर्यादींकडे आला होता, तर संबंधित परप्रांतीय आरोपींचा ठेका रद्द करण्यात आला होता. ठेका का रद्द करण्यात आला ? याची चौकशी करण्यासाठी आरोपी रेल्वेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात आले होते. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या फिर्यादींवर अचानक हल्ला चढवण्यात आला.या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे .यात पाच ते सहा तरुण तिघांना मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे .आरोपी तरुणांच्या हातात धारधार शस्त्र असून त्यांनी तरुणांना जबर मारहाण करत जखमी केले आहे .त्यानंतर तरुणांना भाईंदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे .
मराठी तरुणांना इथे काम करू देणार नाही, खुलेआम धमकी
हल्लादरम्यान आरोपींनी “मराठींना येथे काम करू देणार नाही,” अशी खुलेआम धमकी दिल्याचेही आरोप होत आहे. या गंभीर प्रकारानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गेला काही दिवसांपासून मुंबईतून सातत्याने अशा घटना समोर येत आहेत .या प्रकरणी पोलीस नक्की काय कारवाई करतात याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे .
आणखी वाचा