
मुंबई: दादरच्या प्रसिद्ध कबुतरखान्यावर लावलेली ताडपत्री हटवण्याच्या मुद्द्यावरून आज जैन समाजाकडून आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. मुंबई महानगरपालिकेने हटवण्याची कारवाई सुरू करण्याआधीच जैन समाजाच्या काही सदस्यांनी स्वतः कबुतरखान्यात जाऊन ताडपत्री काढून टाकली. यासोबतच कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबूही हटवण्यात आले आहेत. आज सकाळी दादर कबुतरखाना परिसरात जैन समाजाच्या वतीने प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. काहींनी आक्रमक पवित्रा घेतला, कबुतरखान्यात प्रवेश करून ताडपत्री फाडली आणि ती बाजुला हटवली. या कृतीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. महिला सदस्यांनी देखील कबुतरखान्यात प्रवेश करून ताडपत्री हटवण्याच्या कारवाईत सहभाग घेतला. काल (मंगळवारी) कबुतरखान्याबाबत मुख्यमंत्र्यानी बैठक घेतली होती, त्यामध्ये काही सकारात्मक गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती दिली होती, त्यानंतर आज जैन समाज आक्रमक झाल्याचं दिसून आलं. याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढांनी म्हटलं की, जे काही झालं ते चुकीचे झाले, मी मंदिरात जाऊन समाजाच्या लोकांशी बातचीत करेन, मुख्यमंत्री यांनी देखील काल बैठक घेतली, ज्या लोकांनी हे केले त्याची चौकशी मी करेन, असंही लोढांनी म्हटलं आहे.
यापेक्षा जास्त कोणी चांगलं काही करू शकत नाही
याबाबत बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं की, आज सकाळी दादरच्या कबुतरखाना येथे घटना घडली ती व्यथित करणारी आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेऊन सर्वांचं ऐकून योग्य मार्गदर्शन केलं होते. त्याच्या अमंलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील होतो, मध्येच घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी सर्वांनी विनंती करतो हे सर्व थांबवावं. काल जो मध्य मार्ग काढला गेला आहे, त्या निर्णयाबरोबर सर्वांनी राहायला पाहिजे, माझी व्यक्तीगत विनंती आहे, यापेक्षा जास्त कोणी चांगलं काही करू शकत नाही, जे काल मुख्यमंत्री फडणवीसांनी निर्देश दिले आहेत, असंही पुढे लोढांनी म्हटलं आहे.
मी सुचना मिळाल्यावर मी लगेच इथे आलो. जे झालं ते फार चुकीचं होतं. बाहेरच्या लोकांनी हे केलं आहे, आमचा रोल यामध्ये नाही
जैन समाज आणि साधू संत त्यांच्यासोबत नाहीत. ट्रस्टीही तुमच्यांशी बोलतील, बाहेरचे लोक कोण होते माहिती नाही. ट्रस्टच्या लोकांचा सहभाग नव्हता, कारवाईची मागणी कशाला, पोलिस योग्य कारवाई करतील, असंही लोढा यांनी म्हटलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर कारवाई करण्यात येत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कबूतरखाने मुंबई शहरात बंद करण्यात आलेले आहेत. मात्र याला काही लोकांकडून विरोध केला जातोय. मुंबईत कबूतरखाने सुरू राहावेत, यासाठी जैन समाज चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह जैन समाजाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. यानंतर दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं होतं.
कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यापूर्वीच जैन समुदायाचा जमाव आक्रमक
आज दादर कबुतरखान्याच्या परिसरात जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आज सकाळीच काही जैन बांधवांनी आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करु, आम्ही कुठलीही जोरजबरदस्ती करुन ताडपत्री हटवणार नाही, असे म्हटले होते. मात्र, पालिकेने कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यापूर्वीच जैन समुदायाचा जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून काढून टाकली.
कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस
दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने कंट्रोल फिडिंग करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद केले. परंतु त्यावरून गुजराती जैन समूदाय मात्र आक्रमक झाल्याचं दिसून आला.
आणखी वाचा