
Kabutar Khana Dadar मुंबई: मुंबईतील कबुतरखान्यावरुन (Kabutar Khana) सध्या जैन समाज आक्रमक झाला आहे. जैन समाजाने आज (6 ऑगस्ट) दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) परिसरात मोठं आंदोलन करत ताडपत्री फाडून टाकली. हाती सुऱ्या घेत जैन आंदोलकांनी ताडपत्री, बांबूंना लावलेल्या सुतळी तोडल्या. ताडपत्री हटवून आंदोलकांनी कबुतरखाना पुन्हा सुरू केला. कबुतरखान्यावर लगेच धान्य टाकून कबुतरांना खाणंही आंदोलकांनी दिलं. जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होतं. सकाळी 10 वाजता पूर्वनियोजित असलेलं आंदोलन रद्द झाल्याचं आधी सांगण्यात आलं. मात्र अचानक साडेदहाच्या दरम्यान शेकडो आंदोलक इथे जमा झाले आणि त्यांनी आंदोलन करत कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री फाडून टाकल्याचे समोर आले. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या नियमांचे महापालिकेकडून पालन केले जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.
जैनधर्मीयांच्या आंदोलनानंतर महानगरपालिकेची रोखठोक भूमिका-
कबुतरखान्यांविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्याकरता एक समिती गठीत केली जाणार आहे. कबुतरखान्यावरील ताडपत्री महापालिका हटवणार नाही, न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन महापालिकेकडून केले जाणार आहे. दादर कबुतरखान्याजवळील आंदोलनानंतरही मुंबई महापालिका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करणार आहे, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत कबुतरखाने बंदच ठेवण्यात येणार आहे. कबुतरखान्यांविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्याकरता एक समिती गठीत केली जाईल, ही समिती न्यायालयापुढे आपली निरीक्षणे मांडेल. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेत सामूहिक रित्या राज्य सरकार आणि महापालिकेचे एक मत झालं आहे. न्यायालय जे आदेश देतील त्यानुसारच आम्ही कारवाई करू, सध्या न्यायालयाने आम्हाला (महापालिकेला) आणि पोलिसांना जे आदेश दिले आहेत त्याचे आम्ही पालन करत आहोत, असं महापालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
ताडपत्री फाडली, बांबू तोडले; दादरच्या कबुतरखान्याजवळ काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज झाला होता. याविरोधात जैन समाजाने मोर्चाही काढला होता. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये, यासाठी कंबर कसली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कबुतरखाने बंद करु नयेत, असे आदेश महापालिकेला दिले होते.
न्यायालयाने कबुतरखाना बंद करण्याचे आदेश का दिले?
कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या. कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घातली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर कारवाई करण्यात येत आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा