आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती झाली असून, ‘उत्कर्ष पॅनल’ या नावाने ते निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक अठरा ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना यांनी एकत्र येत ‘उत्कर्ष पॅनल’ची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी जारी केलेल्या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत. ‘ठाकरे ब्रँड’ या नावाने या युतीचे प्रमोशन केले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या युतीकडे एक ‘रंगीत तालीम’ म्हणून पाहिले जात आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी अद्याप अधिकृत राजकीय युतीची घोषणा केलेली नाही, मात्र या निवडणुकीतील एकत्र येण्याने भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांचे संकेत मिळत आहेत. ही घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे.