
मुंबई : मुंबईत कबुतरखाने बंद करण्यावरून मोठा गोंधळ पहायला मिळतो आहे. कबुतरखान्यांवरील बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे, अशातच दादर कबूतरखाना ट्रस्टकडून परिसरात जागोजागी फलक लावून आवाहन करण्यात आलं आहे. कबुतरांना कोणीही धान्य घालू नये. कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नसल्याचं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे, ट्रस्टने महानगरपालिकेकडे याबाबत परवानगीची विनंती केली असून, महापालिकेने सहा ते आठ या सकाळच्या वेळेत धान्य घालण्यास मौखिक परवानगी दिली आहे. मात्र, ती अद्याप लेखी स्वरूपात मिळालेली नसल्याने, हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवत नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन फलकांमधून करण्यात आलं आहे. तसेच कबूतरांना कारवर ट्रे ठेवून दाणे खाऊ घालणाऱ्या महेंद्र सकलेचाची गाडी जप्त करण्यात अली आहे .शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात महेंद्र संकलेचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संकलेचावर गुन्हा दाखल करत गाडी जप्त केली आणि नोटीसही दिली. हायकोर्टाच्या नियमांचे उल्लघन करणाऱ्या महेंद्र संकलेचावर पोलिसांनी कारवाई केली आहे. अशातच कबुतरखान्यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजू दिसून येत आहेत.
कबुतरखान्यांवरील बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवली असली तरी वाद अजून सुरूच आहेत. कबुतरखान्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यातील वाद मिटलेला नाही. शनिवारीही दादरचा कबुतरखाना येथे दोन्ही बाजूंकडून आपापले मुद्दे मांडण्यात आले आहेत.
काही दादरकर म्हणाले, आम्ही आमच्या लहानपणापासून येथे राहत आहोत. आम्हाला कधीही कबुतरांचा त्रास झाला नाही. कबुतरांमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. मग आताच त्यांच्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत याचा शोध कोणी लावला, असा सवाल समर्थकांचा आहे. यापैकी काहींनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, कबुतरांना दाणे टाकल्याबद्दल पाचशे रुपये दंडही भरला आहे. दुसरीकडे विरोधकांचे म्हणणे आहे की, कबुतरखाने असावेत; पण ते शहराच्या मध्यभागी नसावेत. कमी लोकवस्ती असेल अशा ठिकाणी कबुतरखाने असावेत.
शहराबाहेर दूर अंतरावर मोकळ्या जागेमध्ये कबुतरखान्यांना जागा देण्यात यावी. कबुतरांना दाणे टाकल्यामुळे अन्न शोधण्याची त्यांची सवय मोडली आहे. आपण त्यांच्या चांगल्या सवयी आपण बिघडवत आहोत, त्यांना आपण अन्न देत असल्याने ते अन्नाच्या शोधात फिरत नाहीत, त्यामुळे त्यांच्यातील उडण्याची क्षमता संपली आहे. काही कबुतरे तर एक किलोमीटर अंतर उडली, तरी थकून जातात. एक प्रकारे आपण कबुतरांना अपंग बनवले आहे. कबुतरखान्यांवर प्रेम करणाऱ्यांनी शेजार जैन मंदिराच्या इमारतीला जाळ्या का बसवल्या, असा सवाल देखील काही रहिवाशांनी केला. त्यावर एकाने उत्तर देताना म्हटलं की, कबुतरांना दाणे टाकणे सध्या बंद असल्यामुळे कबुतरे खाद्याच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहेत. चुकून एखादे कबुतर मंदिरात आले, पंखा सुरू असेल तर त्याला इजा होऊ शकते, इजा होऊ नये यासाठी आम्ही जाळ्या बसवल्या आहेत.
दादरमधील कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिराला कबुतरांमुळे त्रास होऊ नये, ते मंदिरात येऊन घाण करू नयेत म्हणून जाळ्या लावण्यात आल्या आहेत, असं काहींनी म्हटलं होतं. कबुतरांमुळे मंदिराच्या स्वच्छतेला बाधा येत होती, त्यामुळे ही जाळी लावण्याचा निर्णय घेण्यात आला, यावर बोलताना एका जैन बांधवाने म्हटलं की, मंदिराच्या आतमध्ये असलेल्या पंख्यामुळे त्यांचा जीव जाऊ नये म्हणून तिथे जाळ्या लावलेल्या आहेत. इतर कोणत्या ठिकाणी किंवा आमच्या दुकानामध्ये पंखा नसल्यामुळे जाळी लावलेली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आणखी वाचा