मुंबईतील कबूतरखान्यावरून सुरू असलेल्या वादाच्या मालिकेने आता गंभीर वळण घेतले आहे. जैन समाजाचे मुनी नीलेशचंद्र विजय यांनी गरज पडल्यास शस्त्र हाती घेण्याची भाषा केली आहे. त्यांनी सरकारला थेट आव्हान देत, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे भूमिका न घेतल्यास कबूतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावर शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशात न्याय व्यवस्था अस्तित्वात असून, ज्यांना कबुतरे आवडतात त्यांनी ती आपल्या घरात पाळावीत, असे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. जैन मुनींच्या वक्तव्यानंतर दादरच्या कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे, ज्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. यापूर्वी बुधवारी जैन समाजाने कबूतरखान्याजवळ मोठे आंदोलन केले होते, त्यावेळी पालिकेने लावलेल्या ताडपत्री आंदोलकांनी फाडल्या होत्या. “यदी जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्रपण उचलू,” असे जैन मुनींनी म्हटले आहे. तर, “या देशामध्ये कायदा आहे, कोर्ट आहे, पोलीस आहे,” असे मनीषा कायंदे यांनी सांगितले.