Dadar Kabutar Khana : कबुतर खाने (Dadar Kabutar Khana:) बंद केल्यानंतर खाद्य टाकणाऱ्यांकडून 1 ऑगस्टपासून ते आतापर्यंत मुंबई महानगर पालिकेने (Mumbai Municipal Corporation) 32 हजार रुपये दंड वसूल केला आहे. सर्वात जास्त दंड हा गोरेगाव पश्चिम विभागातून (पालिकेच्या पी एस) 6 हजार रुपये इतका दंड वसुल करण्यात आला आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या दादर विभागातून 5 हजार 500 रुपये इतका दंड पालिकेकडून वसुल करण्यात आला आहे. तर पालिकेच्या वॉर्ड B, C, E, L, N या विभागातून शून्य रुपये पालिकेकडून वसुल करण्यात आला नाही.
मुंबई महानगर पालिकेकडून आतापर्यंत 3 गुन्हे दाखल
तसेच मुंबई महानगर पालिकेकडून आतापर्यंत 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दादरमध्ये 2 गुन्हे तर गिरगांवमध्ये 1 गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगर पालिकेने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यावर कडक कारवाईला सुरवात केली आहे. कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांना सुरुवातीला समज देणे त्यानंतर दंडात्मक कारवाई करणे तरीही वारंवार खाद्य टाकले तर थेट पालिकेकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. ही कारवाई करण्यासाठी महानगर पालिकेकडून घनकचरा विभागाच्या वतीने ठिकठिकाणी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
नेमंक प्रकरण काय?
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने ताडपत्री टाकून दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) झाकून बंद केला होता. मात्र, 6 ऑगस्टला जैनधर्मीयांनी (Jain Community) अचानक हल्लाबोल करत कबुतरखान्यावरील ही ताडपत्री फाडून टाकली होती. यावेळी दादर (Dadar News) कबुतरखान्याच्या परिसरात जमलेला जैन समुदाय प्रचंड आक्रमक झाला होता. पालिकेने ताडपत्री टाकण्यासाठी वापरलेले बांबू मोडून टाकण्यात आले होते. तसेच जैन समाजातील काही महिला सुतळी आणि दोऱ्या कापण्यासाठी चाकू घेऊन आल्या होत्या. या सगळ्यानंतर रविवारी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी जहाल भाषा वापरत आम्ही आमच्या धर्मासमोर न्यायालयालाही मानत नाही, असे म्हटले होते. त्यांच्या या धमकीनंतर संताप व्यक्त केला जात आहे.
पुढील सुनावणी 13 ऑगस्टला पार पडणार
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सरकार आणि न्यायालयाला आव्हान दिल्यानंतर पुढील काही तासांतच चक्रं फिरली आणि मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना पुन्हा एकदा ताडपत्रीने झाकून टाकला. पालिकेने गेल्यावेळीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने चारही बाजूने ताडपत्री लावून एकही कबुतर आतमध्ये शिरणार नाही, याची व्यवस्था केली आहे. कबुतरखान्याच्या चारही बाजूंनी गोलाकार बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. तसेच परिसरात दंगल नियंत्रण पथकासह प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता गेल्यावेळप्रमाणे जैन समाजाला याठिकाणी आंदोलन करणे शक्य होणार नाही. जैनधर्मीयांनी आंदोलन करत 6 ऑगस्ट रोजी ताडपत्री हटविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावर न्यायालयाने ही ताशेरे ओढले. कबुतरखाना बंद की सुरू याची पुढील सुनावणी 13 ऑगस्ट ला पार पडणार आहे . तोपर्यंत न्यायालयाचा आदेश असल्याने कबुतरखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्यासाठी अडून बसणाऱ्या जैन समुदायाला आता मराठी एकीकरण समिती प्रत्युत्तर देणार, आंदोलनाचा इशारा
आणखी वाचा