
Maharashtra Weather Update : राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार (Rain Update) कमबॅक केलं आहे. काल रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, सध्या देखील पावसाचा जोर कायम आहे. दमदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. तर उर्वरित बहुतांश जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचे चित्र आहे. असे असताना राज्यात 16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.
राज्यात 17 ते 21ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात आजपासून ते 21 ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ज्यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाडामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ज्यामध्ये वीज चमकणे, गडगडाटांसह 40-50 किमी प्रति तास वादळी वारे वाहण्याची ही शक्यता वर्तवली आहे.
वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजानुसार आज सकाळी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडा, सखल भागात किंवा नदी, नाल्याकाठी असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याच आव्हान करण्यात आलंय.
पाण्याच्या लोंढ्यात तब्बल 40 जनावरे वाहून गेल्याची घटना
दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामूळे नदीनाल्यांना पुराचा फटका बसला आहे. वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे परिसरातील प्रकल्पाच्या सांडव्याला पाणी आल्यानंतर अचानक आलेल्या पुरसदृश पाण्याच्या लोंढ्यात तब्बल 40 जनावरे वाहून गेल्याची घटना घडली. त्यातील10 ते 15 जनावरांचा शोध लागला इतर जनावर अद्याप बेपत्ता आहेत.
पैनगंगा नदीच्या पुलावरून पुराच पाणी; पुसद-हिंगोली राज्य मार्ग बंद
यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ईसापुर धरणातील जलसाठ्यात मोठी आवक झाली आहे. परिणामी ईसापुर धरणाची 9 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आली. शेंबाळपिंपरी नजीक पैनगंगा नदीवरील पुलावर पाणी असल्यामुळे पुसद- हिंगोली हा राज्य मार्ग वाहतूक साठी पूर्णपणे बंद झाला झाला आहे.
धरणगावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला मोठा पूर!
जळगावच्या धरणगाव शहरातील धरणी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला प्रचंड पूर आल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला नदीसदृश स्वरूप प्राप्त झाले असून, कठडे नसल्याने पुराचे पाणी मोठ्या वेगाने दुकाने व घरांमध्ये शिरले. परिणामी धरणी परिसर आणि जैन गल्ली पूर्णपणे जलमय झाला आहे. अनेकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कालच्या तुलनेत आज पुराची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल आलेल्या पुरानंतर देखील पालिका प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
मच्छीमारांसाठी इशारे
दुसरीकडे, कोकण किनारपट्टीत 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान 50-60 किमी प्रति तास वेगाने वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश
दरम्यान, सचेत ॲपमार्फत आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नागरीकांना अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नदी काठाच्या गावांना इशारा, मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी संपर्क क्रमांक जारी
रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तसेच कुंडलीका नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तर खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र 24×7 सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. 022-22027990 किंवा 022-22794229 किंवा 022-22023039 तसेच मोबाईल 9321587143 उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा