
Maharashtra Rain Weather Alert मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत (Mumbai Rain) मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. शहर, तसेच उपनगरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. त्यानंतर शनिवारीही पावसाचा जोर (Weather Update) कायम होता. अशातच सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी 8.30 ते शनिवारी सकाळी 8.30 दरम्यानच्या 24 तासांत 244.7 मिमी पावसाची नोंद झाली. याआधी ऑगस्ट 2020 मध्ये 268.6 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी शनिवारी 24 तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर राज्याभारत कोसळणाऱ्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (17 ऑगस्ट) कोकणासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडामध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सोबतच सुमारे 40 ते 50 किमी ताशीचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुढील 3-4 तासांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्य
तर कोकण किनारपट्टीवर 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान 50-60 किमी/ताशी वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आलं आहे. अशातच पुढील 3-4 तासांत पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात पावसामुळे चार जणांचा बळी, दोन बेपत्ता
मुंबईसह मुंबई उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा राज्यातील सर्वच विभागांना फटका बसला. विदर्भात विविध घटनांत चौघांचा बळी गेला, तर मराठवाड्यात भिंत पडून दोघांचा मृत्यू झालाय. विदर्भात अनेक जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. जळगाव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली, तर शेतात पाणी गेल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले. कोकणातील रायगड व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत पावसाचा जोर होता. अनेक नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला.
विदर्भात पावसामुळे चार जणांचा बळी गेला, दोन बेपत्ता आहेत तर तीन जण जखमी आहेत. शनिवारी अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, भंडारा आदी जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरामध्ये सुबराव लांडगे नावाचा शेतकरी वाहून गेला. पावसामुळे भित पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. शेख नासेर आमीन व हसिना बेगम शेख अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर कायम
मुंबई आणि उपनगर या दोन्ही भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. कालपासून सुरू झालेला पाऊस आजदेखील सुरूच आहे. सततच्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मात्र या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्टवर आहेत. नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत की, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये.
राज्याभारत इतर भागातील स्थिती
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा