
Maharashtra Rain Weather Alert : राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाच्या (Heavy Rain) सरी कोसळत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आजपासून (18 ऑगस्ट) पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला आज पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. तर तिकडे रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. परिणामी संभाव्य पावसाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच नदी काठाच्या नागरिकांनी विशेष सुरक्षा बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुण्याच्या घाट परिसरासाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’
पुण्याच्या घाट परिसरासाठी पुढील तीन दिवस हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सध्या पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. हवेच्या कमी दाब क्षेत्राचा आस त्याच्या सरासरीच्या जागेपासून दक्षिणेकडे सरकला आहे.
राज्यभरात पावसाचे थैमान, नदी– नाल्यांना पूर
राज्यात कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आला असून, बाजारपेठांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी शेतातही पाणी साचले आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीतील नारंगी नदीला पूर आला असून, जगबुडी नदीचे पाणी थेट खेड शहरात शिरले आहे. गड नदीच्या पुरामुळे संगमेश्वरमधील माघजण बाजारपेठेत पाणी शिरले. गड नदीकाठच्या कासे, कळंबूशी, वडेरू, नाईशी येथील शेती पाण्याखाली गेली आहे. जवळपास सात ते आठ गावांचा संपर्क तुटला आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
रस्त्यांना नदीचे स्वरूप, पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी
मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेडमध्ये पैनगंगा आणि आसना नद्यांना पूर आला आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. चंद्रपूरमध्ये वर्धा नदीला पूर आल्याने भोळेगाव पूल पाण्याखाली गेला. नागपूरमध्ये नांद नदीच्या पाण्यात दुचाकीस्वार वाहून गेला. जळगावमध्ये वाघूर नदीला पूर आला. धाराशिवमधील तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी दाटले आहे. फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.
येवल्यात जोरदार पाऊस, पिकांना मिळाले नवे बळ
नाशिकच्या येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरड्या हवामानाने शेतकरी हवालदिल झाले होते. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजांना अखेर पावसाने दिलासा दिला आहे. येवला शहरासह परिसरात काल सायंकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, बाजरी या खरीप पिकांसाठी हा पाऊस जीवदान देणारा ठरला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी माना टाकू लागली होती. मात्र आज झालेल्या पावसाने वेळीच पिकांना पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, येवला शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते.
बीड जिल्ह्यात 17 महसूल मंडळांत अतिवृष्टी
बीड जिल्ह्यात दोन दिवस दमदार पाऊस झाला असून बीड, गेवराई, पाटोदा, केज आणि शिरूर तालुक्यातील 17 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झालीय. या पावसानं खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या मंडळांत अतिवृष्टीची नोंद
बीड, गेवराई, पाटोदा, केज, परळी, शिरूर या तालुक्यांतील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खरीप हंगामातील पिके वाचण्यास मदत होणार आहे. 22 मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.
137 गावांना सतर्कतेचा इशारा
नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, प्रशासनाने 137 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या गावांमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, नदीकाठच्या लोकांना काळजी घेण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा