
मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण देण्याच्या मागणीवर सुवर्णमध्य साधला असून उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, गेल्या 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आरक्षण आंदोलनाचा विजय झाल्याचं बोललं जात आहे. शासनाने मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधवांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. मात्र, या शासन निर्णयाने ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी मंत्रिमंडळ बैठकालाही दांडी मारली होती. त्यानंतर, आज राज्य शासनाने ओबीसी समाजासाठीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका घेत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातल्याचे वृत्त आहे. भुजबळांच्या नाराजी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची देवगिरी या सरकारी निवासस्थानी बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर, महायुतीत मंत्री भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर संभाव्य अडचणी लक्षात घेत बैठक होतं असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, मंत्री भुजबळ यांनी पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीत ओबीसी आरक्षणप्रश्नी होतं असलेल्या अन्यायाबाबत उघड भूमिका घेतल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या पार पडणाऱ्या बैठकीला विशेष महत्व आहे.
ओबीसीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली जाणार असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाल्याचे समजते. मराठा आरक्षण संदर्भात शासन निर्णय काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्यामुळे शासनाने ओबीसी समाजाची भूमिका लक्षात घेत पाऊले उचलली आहेत. आक्रमक ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात येत आहे. ओबीसी समाजासाठी देखील 6 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येत आहे. त्यासाठी, प्रत्येक पक्षातील दोन सदस्यांची नेमणूक करण्यात येईल. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आजच गठीत होणार असून आजच जीआर देखील काढला जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
हैदराबाद गॅझेटच्या जीआरची होळी
मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या जीआर विरोधात जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर जालन्यात ओबीसी बांधवांनी फाडून पायदळी तुडवला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत काल राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला आहे. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची घुसखोरी होत असल्याचा आरोप ओबीसी समाजाकडून केला जात आहे. जीआर रद्द झाला न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे म्हणत भोकर येथे आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हैदराबाद गॅजेटचा जीआर काढल्यानंतर आज भोकर येथे तहसील कार्यालय समोर ओबीसी आंदोलकांनी जीआरची होळी केली.
हेही वाचा
आणखी वाचा