
नागपूर : बॉलिवूडमध्ये अन् सिनेसृष्टीत गाजलेल्या पुष्पा चित्रपटात रक्तचंदन म्हणजेच लाल चंदनामुळे अनेकांची प्रचंड भरभराट होत असल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. मात्र, त्याच रक्तचंदना पायी विदर्भातील एका शेतकऱ्यावर श्रीमंती गमावण्याची वेळ आली आहे. यवतमाळ (Yawatmal) जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खर्ची गावातील पंजाबराव शिंदे या शेतकऱ्यासोबत ही घटना घडलीय. शिंदे कुटुंबीयांच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये असलेले हे रक्तचंदनाचे झाड 100 वर्षांपेक्षा जास्त जुने, या डौलदार वृक्षामुळे पंजाबराव शिंदे व त्यांच्या इतर चार भावांना रेल्वे (Railway) खात्याकडून 50 लाख रुपये मिळाले होते. मात्र, आता ते झाड चंदनाचे नसल्याचे सांगत त्यांच्याकडून ती रक्कम परत घेतली जात आहे.
शिंदे कुटुंबीयांची सात एकर शेती असलेल्या खर्ची गावातून वर्धा–यवतमाळ-पुसद-नांदेड ही नवी रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. त्यासाठी अनेक वर्षांपूर्वी सर्वेक्षण होऊन 2013 मध्ये शिंदे कुटुंबीयांची बागायात असलेली सात एकर शेती रेल्वेने अधिग्रहित केली. 2018 मध्ये जमिनीसाठी 1 कोटी 33 लाख रुपयांचा मोबदला ही देण्यात आला. मात्र जमिनीवरील झाडांसाठीचा मोबदला निश्चित करण्यात आला नव्हता. शिंदेंच्या शेतावरील अनेक जुन्या झाडांपैकी शंभर वर्ष जुना रक्तचंदनाचेही एक झाड होते. अनेकवेळेला प्रयत्न करूनही रेल्वेकडून झाडांबद्दलची नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे पंजाबराव शिंदे यांनी गेल्या वर्षी न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाच्या निर्देशानंतर ही रेल्वेने रक्त चंदनाच्या झाडाचे वन विभागाकडून योग्य मूल्यांकन करून घेतले नाही. दुसऱ्या बाजूला शिंदे कुटुंबीयांनी खासगी तज्ञांकडून मूल्यांकन करवून घेत 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या रक्तचंदनाच्या झाडासाठी 4 कोटी 97 लाख रुपयांचे मूल्यांकन काढले होते. रेल्वेकडून झाडांच्या मूल्यांकनासंदर्भातल्या प्रक्रियेमध्ये टाळाटाळ करून दिरंगाई केली जात असल्याचे लक्षात येताच न्यायालयाने रक्तचंदनाच्या त्या झाडासाठी 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली होती. त्यापैकी 50 लाख रुपये शिंदे कुटुंबीयांना देण्याचे आणि उरलेले 50 लाख रुपये रेल्वेकडून योग्य मूल्यांकन होईपर्यंत न्यायालयात जमा ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्याच अनुषंगाने यावर्षी मे महिन्यात शिंदे कुटुंबीयांना 50 लाख रुपये रक्तचंदनाच्या झाडापायी मिळाले. मात्र, केवळ एका झाडासाठी 1 कोटी रुपये द्यावे लागत आहेत, हे लक्षात आल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना जाग आली आणि मूल्यांकनाच्या प्रक्रियेची आठवण झाली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी नुकतेच वन विभागाकडून रक्तचंदनाच्या झाडा संदर्भात मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडली. ज्या झाडाला काही वर्षांपूर्वी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी 100 वर्षे जुने असल्याचे सांगत ते रक्तचंदनाचे झाड असल्याचे मान्य केले होते. त्याच झाडाला नुकतच वन विभागासोबत केलेल्या मूल्यांकनाच्या वेळेला रेल्वेने रक्तचंदन मान्य करण्यास नकार दिला आणि तो बिजासालचे झाड असल्याचे सांगत त्यासाठी अवघ्या 10 हजार 981 रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली आहे. रेल्वेच्या या घूमजावामुळे शिंदे कुटुंबीयांची केवळ अडचणच झालेली नाही, तर ते वनविभाग आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर प्रचंड नाराज आहे.
भारतात रक्तचंदनाच्या तीन प्रजाती
भारतात रक्तचंदनाच्या १) टेरेकॉर्पस सेंटालिनस, २) टेरेकॉर्पस इंडिकस, ३) टेरेकॉर्पस मारसुपियम अशा तीन व्हरायटी असून आमच्या शेतातील झाड टेरेकॉर्पस मारसुपियम श्रेणीतील रक्तचंदन असून त्यासाठीची नुकसान भरपाई ही किमान 50 ते 60 लाख रुपयांच्या घरात असली पाहिजे, असा दावा पंजाबराव शिंदे यांनी केला आहे. याशिवाय रेल्वेने एवढे वर्ष झुलवल्यामुळे ती नुकसान भरपाई व्याजासकट मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
झाड प्रकरण नागपूर खंडपीठात
एवढेच नाही तर रेल्वेने शिंदेंच्या शेतावरील झाडाला बिजासाल असल्याचे सांगत देऊ केलेली 10 हजार 981 रुपयांची नुकसान भरपाई स्वीकारण्यास आणि आधीच त्या झाडाबद्दल कोर्टाच्या माध्यमातून घेतलेले 50 लाख रुपये परत देण्यास शिंदे कुटुंबीय तयार नाही. तर, ही गरीब शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोपही त्यांना केला आहे. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ समोर न्यायप्रविष्ठ आहे. लवकरच न्यायालयात या संदर्भात सुनावणी होणार आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अत्यंत मागास भागाला जोडणाऱ्या रेल्वे लाईनसाठी खुशीने आपली बागायत जमीन देणारा शेतकरी कुटुंब रेल्वे अधिकाऱ्यांच्या अशा गोंधळामुळे अडचणीत सापडलं आहे. आता, त्यांना न्यायालयाकडूनच ते झाड रक्तचंदनाचे आहे की नाही आणि त्याची योग्य नुकसान भरपाई किती असावी यासंदर्भात अपेक्षा आहेत.
हेही वाचा
आणखी वाचा