
RDX Mumbai Bomb Threat: गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईला बॉम्बस्फोटाची गंभीर धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर एक अज्ञात मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेजमध्ये दावा करण्यात आला की, 14 पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत पोहोचले असून, 34 गाड्यांमध्ये 400 किलो RDX लपवण्यात आले आहे. या स्फोटांमुळे जवळपास 1 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा करण्यात आला होता. आता धमकीचा मेसेज पाठवणाऱ्यास पोलिसांनी नोएडा येथून अटक केली आहे.
आरोपी नोएडामधून अटकेत
धमकीच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी नोएडा पोलिसांशी संपर्क साधला. नोएडा पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव अश्विनी असल्याचे समोर आले असून, तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे आणि मागील 5 वर्षांपासून नोएडामध्ये वास्तव्यास होता. नोएडा पोलिसांनी अश्विनीला अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त करून तपास सुरू केला आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
धमकीचा संदेश मिळताच मुंबई पोलिस, अँटी टेरर स्क्वॉड (ATS), सायबर सेल, आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी तात्काळ कारवाई केली. सध्या संपूर्ण मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विशेषतः गणपती विसर्जन मार्ग, रेल्वे स्थानके, मॉल्स, आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
काय दिली होती धमकी?
धमकीच्या संदेशात म्हटले होते की, बॉम्बस्फोटामध्ये 400 किलो आरडीएक्सचा वापर केला जाईल आणि त्यातून सुमारे 1 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसवण्यात आले आहेत. धमकीच्या मेसेजमध्ये ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या कथित दहशतवादी संघटनेचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच, भारतात 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचाही दावा करण्यात आला होता.
मुंबईला बॉम्बस्फोटाची याआधीही धमकी
मुंबईला या देखील अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत.
– वरळी येथील Four Seasons हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा बनावट फोन आला होता.
– 14 ऑगस्टला ट्रेनमध्ये स्फोट होणार असल्याची धमकी.
– 26 जुलै रोजी CSMT स्थानकाला उडवण्याची धमकी.
या सर्व घटनांमध्ये कोणताही स्फोट किंवा संशयास्पद वस्तू आढळली नव्हती, परंतु नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा