
सातारा: भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील (Jayant patil) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दीक हमरीतुमरी सुरू असल्याचे दिसून येते. जयंत पाटील यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकरांवर मंगळसूत्र चोर अशी टीका केली होती. त्यानंतर, पडळकरांनीही जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत बोचरी आणि खालच्या स्तरावरील शब्दात पलटवार केला होता. मात्र, यावेळी जयंत पाटलांनी पडळकरांना प्रत्त्युत्तर न देता अनुल्लेखाने मारले होते. आता, पुन्हा एकदा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील (Sangli) दसरा मेळाव्यानिमित्ताने आयोजित सभेत जयंत पाटील यांच्यासह वाळव्यातील त्यांच्या समर्थकांवर तिखट शब्दात टीका केली आहे. जयंतराव, तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं? असा सवाल करत पडळकरांनी जयंत पाटलांना, जयंत्या.. असेही म्हटलं होतं.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पुन्हा एकदा पातळी सोडून भाषा वापरली. आता, त्यांच्या या भाषणावरुन राजकीय वर्तुळातून टीका होत आहे. त्यात, राष्ट्रवादी काँग्रेसची या भाषणावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिंकांत शिंदे यांनी पडळकरांच्या भाषणावरुन तीव्र संताप व्यक्त केला. पडळकर ही टीका करता असताना आपल्या मागे कोणीतरी आहे, हे त्यांना माहिती आहे म्हणूनच अशी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी समज देऊन देखील जाणीवपूर्वक टीका केली जात आहे, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.
विधिमंडळात झालेल्या मारहाणीचे समर्थन कोण करत असेल तर कायदा, सुव्यवस्था आणि न्याय मागण्याबाबतची खंत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. भाजपने सुसंस्कृतपणा असल्याचे दाखवू नये, सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्याचे समजून अशा प्रकारच्या टीका होत आहेत. हे सर्व ठरवून, प्लॅन करून केलं जात आहे. पाटील हे मोठे नेते आहेत ते दबत नाहीत, त्यामुळे त्यांना डॅमेज करण्यासाठी हे सर्व सुरू आहे, अशा शब्दात शशिकांत शिंदे यांनी गोपीचंद पडळकरांच्या भाषणावरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. ज्या सरकारकडून दबावाचे राजकारण सुरू आहे, त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्रातील जनता याचा विचार करेल. शिस्त पाळणाऱ्या पक्षातच आता शिस्त पाळली जात नाही. मग त्यांचे कान RSS च्या प्रमुखांनी टोचावे, असेही शिंदेंनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा