
Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) युती होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटीही सातत्याने सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ब्रँड ठाकरे भाजपचा (BJP) बेलगाम झालेला विजयरथ रोखणार का, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं त्यांच्याकडे वळतील, असा काही राजकीय विश्लेषकांचा होरा आहे. परंतु, ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला (Mahayuti) त्याचा कोणताही फरक पडणार नाही, असा दावा भाजपचे नेते वारंवार करत आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या महाप्रचंड यशानंतर महायुतीच्या नेत्यांना ब्रँड ठाकरेची (Brand Thackeray) फिकीर वाटेनासी झाली आहे. परंतु, मुंबईतील प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती ही अत्यंत वेगळी असल्याची माहिती आता समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीकडे सत्ता, लोकप्रिय योजना आणि प्रचंड रसद असली तरी ठाकरे बंधूंनी ठरवल्याप्रमाणे सर्वकाही पार पडल्यास BMC निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसू शकतो. यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर बसवायचा, असा पण भाजपने केला आहे. मात्र, राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यास या दोघांना एकूण मतांपैकी 52 टक्के मते मिळू शकतात, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. भाजपने काही दिवसांपूर्वी एका बड्या कॉर्पोरेट कंपनीच्या माध्यमातून गुप्तपणे हा अंतर्गत सर्व्हे केला होता, असा दावा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर यांनी ‘मुंबई तक’ पोर्टलवरील चर्चेदरम्यान केला आहे. या सर्व्हेची आकडेवारी भाजप आणि महायुतीसाठी धडकी भरवणारी आहे. या सर्व्हेच्या निकालानुसार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी व्यवस्थितपणे जागावाटप करुन दोघेही एकत्र लढले तर त्यांना BMC निवडणुकीत (BMC Election 2026) 52 टक्के मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपकडून खासगी कंपनीच्या माध्यमातून हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे भाजपच्या मोठ्या पराभवाची आशा वर्तविण्यात आली आहे. मात्र, अलीकडच्या काळात भाजपने लावलेला विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका आणि प्रत्यय निवडणुकीत होणाऱ्या आक्रमक प्रचारामुळे ही परिस्थिती बदलू शकते. मात्र, प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल हा भाजपसाठी निश्चितच चिंता वाढवणार आहे. त्यामुळे आता भाजप राज ठाकरे यांना पुन्हा चुचकारण्याचे प्रयत्न सुरु करणार का, हे पाहावे लागेल.
Shivsena & MNS Alliacne: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास काय होणार?
विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार करता मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 90 जागांवर ठाकरे गट-मनसे युतीला सहजपणे यश मिळू शकते. विधानसभा निवडणुकीत मनसेने 25 जागा लढवल्या होत्या. या सर्व जागांवर मिळून मनसेला 4 टक्के मतं पडली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा वॉर्डनिहाय विचार केल्यास मुंबई महानगरपालिकेच्या 67 वॉर्डमध्ये विजयी उमेदवाराने जितकं मताधिक्य मिळवलं आहे, त्यापेक्षा जास्त मतं ही मनसेच्या उमेदवारांना मिळाली आहेत. अनेक वॉर्डमध्ये मनसेच्या उमेदवारांना विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा 30 टक्के अधिक मतं मिळाली आहेत. या 67 वॉर्डपैकी 39 ठिकाणी ठाकरे गट आणि 28 वॉर्डमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज-उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास उर्वरित 28 वॉर्डमध्येही ठाकरे गटाला विजय मिळू शकतो.
गेल्या बऱ्याच काळापासून निवडणुकीत मनसेला फारसे यश मिळाले नसले तरी मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये मनसे आपली ताकद राखून आहे. यामध्ये वरळी, दादर, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, दिंडोशी, मालाड या परिसराचा समावेश आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागो, हवा कोणाच्याही बाजूने असो पण या भागामध्ये राज ठाकरे यांना मानणारे मनसेचे कट्टर मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मनसेला बऱ्यापैकी मतं ही मिळत असतात. त्यामुळे मुंबईत एकत्र निवडणूक लढवल्यास राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही फायदा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच कधी नव्हे ते या दोन्ही भावांनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली आहे.
मुंबई महानगरपालिकेचे एकूण 227 वॉर्ड आहेत. यापैकी 90 वॉर्डमध्ये मनसेची मतं ही निर्णायक ठरु शकतात. त्यामुळे ज्या वॉर्डमध्ये महायुतीचे उमेदवार थोड्याशा फरकाने आघाडीवर असतील तिकडे एकत्र आल्यास राज आणि उद्धव ठाकरे यांची सरशी होऊ शकते. संपूर्ण मुंबईत मनसेची संघटनात्मक ताकद फारशी नाही. मात्र, मुंबईतील विशिष्ट मराठीबहुल भागांमध्ये मनसेला मानणारा मतदारवर्ग आहे. हा मतदारवर्ग राज ठाकरे यांच्याशी निष्ठावंत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत अगदी 100 किंवा 200 मतांच्या फरकानेही उमेदवाराचा विजय किंवा पराभव होऊ शकतो. मुंबईतील जवळपास 123 वॉर्डमध्ये मनसेची मतं विखुरली आहेत. ही मतं या वॉर्डमध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतात. विधानसभा निवडणुकीत दिंडोशी मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 43 मध्ये मविआच्या उमेदवाराला महायुतीच्या उमेदवारापेक्षा केवळ 1088 मतं जास्त मिळाली होती. त्याचवेळी या वॉर्डमध्ये मनसेच्या उमेदवाराला 1,728 मते मिळाली होती. तर विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 121 मध्ये मविआ आणि महायुतीच्या उमेदवारात 843 मतांचा फरक होता. परंतु, या मतदारसंघात मनसेला मिळालेली मते ही 1096 इतकी होती. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 57 मध्ये महायुतीचा उमेदवार अवघ्या 482 मतांनी पुढे होता. या वॉर्डमध्ये मनसेला मिळालेली मतं ही 918 इतकी आहेत. तर वांद्रे पूर्वेला असणाऱ्या (वॉर्ड क्रमांक 92) मध्ये मविआ आणि मनसेच्या मतांमधील फरक 623 इतका होता. तर मनसेने या वॉर्डमध्ये 1004 इतकी मतं मिळवली आहेत. मनसेच्या या मतांच्या लहान पॉकेटसचा विचार करता मुंबई महानगरपालिकेच्या 90 वॉर्डच्या निकालावर राज ठाकरे पाडू शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात आला आहे.
आणखी वाचा